महामार्ग रूंदीकरण आणि उड्डाणपुलाच्या निर्मितीमुळे काही प्रमाणात वाहनधारकांचा फायदा झाला असला तरी त्यामुळे अनेक समस्याही निर्माण झाल्या असून या समस्या सोडविण्याची आश्वासने अनेक लोकप्रतिनिधींनी दिली असली तरी अद्याप त्यासंदर्भात ठोस कार्यवाही सुरू न झाल्याने समस्या ‘जैसे थे’ आहेत.
व्दारका, मुंबई नाका, रासबिहारी चौफुली, के. के. वाघ महाविद्यालय, हॉटेल जत्रा ही काही त्रस्त ठिकाणे आहेत. त्यापैकी व्दारका येथे विविध समस्या एकत्र आल्या आहेत. या ठिकाणी कोणताही विचार न करता भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. या मार्गाचा अजिबात वापर होत नसल्याने हा मार्ग नेमका कशासाठी तयार करण्यात आला, हा प्रश्नच आहे. या चौकातील नियमित होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याच्या हेतूने याआधी या चौकाचा आकार कमी करण्याचा उपाय करण्यात आला. परंतु त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. परिस्थितीत त्यामुळे कसलाच फरक पडला नाही. एकंदरीत ‘जखम डोक्याला अन् पट्टी गुडघ्याला’ अशी स्थिती येथे अनुभवयास येत आहे. या ठिकाणी खासगी रिक्षा आणि टॅक्सींचा सतत गराडा असतो. रस्त्यावरच ही वाहने उभी राहात असल्याने इतर वाहनांना या जंजाळातून मार्ग काढताना अक्षरश: नाकीनऊ येते. त्यामुळे आपोआपच वाहतुकीची कोंडी होते. या ठिकाणची वाहतूक काही प्रमाणात सुरळीत करावयाची असल्यास टॅक्सी आणि रिक्षांचा येथील तळ उठविणे अत्यंत गरजेचे आहे. प्रवाशांची चढउतार करण्यासाठी रस्त्यावरच ही वाहने उभी राहात असल्याने प्रवाशांचा जीवही त्यामुळे धोक्यात येतो. आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी येथील समस्या लक्षात घेऊन थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कैफियत मांडली. गडकरी यांनी याप्रश्नी लक्ष घालत ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. अर्थात अद्याप त्यासंदर्भात प्रत्यक्षात कार्यवाही सुरू झाल्याचे दिसत नाही.
याशिवाय रासबिहारी चौफुली, के. के. वाघ महाविद्यालय या ठिकाणी सतत होणारे अपघात टाळण्यासाठी भुयारी मार्गाचा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात येत असले तरी ते कामही कधी सुरू होईल, याविषयी निश्चित असे कोणतेही स्वरूप नाही. त्यामुळे सध्या तरी या चौकातून जाताना वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालणे क्रमप्राप्त ठरले आहे. हा प्रश्न काही आजच उद्भवलेला नाही. महामार्ग रूंदीकरणाच्या आधीपासून या ठिकाणी अपघात होत आहेत. त्यामुळे महामार्ग रूंदीकरणाच्या कामात या बाबी विचारात घेणे आवश्यक होते.
रूंदीकरणाप्रसंगीच येथे भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल असे उपाय योजले असते तर कदाचित अनेक जणांचे प्राण वाचले असते. परंतु कोणत्याही नियोजनाविना करण्यात आलेले रूंदीकरण परिसरातील रहिवाशांच्या आणि वाहनधारकांच्या प्राणास कारणीभूत ठरत आहे.