राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षांमुळे यंदा वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखांमधील प्रवेशाचा टक्का घसरला असून त्याचा परिणाम अन्य शाखांमधील प्रवेशांवर झाला आहे. तालुक्यात प्रामुख्याने प्रथम वर्ष शास्त्र व कला शाखेच्या प्रवेशाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थी अधिक आणि जागा कमी अशी स्थिती सध्या आहे.    
बारावी उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांपुढे प्रवेशाअभावी कठीण परिस्थिती उदभवली आहे.  अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखांच्या प्रवेशासाठी असणाऱ्या विविध परीक्षा आता राष्ट्रीय पातळीवर सुरू झाली असून यंदा पहिल्याच वर्षी या परीक्षेचा निकाल कठीण लागला. त्याचा विपरीत परिणाम प्रामुख्याने ग्रामीण भागावर झाला असून कमी गुणांमुळे अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी पुन्हा शास्त्र व कला शाखेकडे वळले आहेत. त्यासाठीच मोठी गर्दी झाली आहे. मात्र ग्रामीण बागातील महाविद्यालयांमध्ये या शाखांच्या एक किंवा दोनच तुकडय़ा असल्याने मोठय़ा संख्येने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होते.    
पंचायत समितीचे उपसभापती किरण पाटील यांनी हा प्रकार माजी आमदार राजीव राजळे हे तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना सांगितला असता त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे त्याकडे लक्षे वेधले असून तातडीने हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.
बारावीत चांगले गुण असूनही अन्य ठिकाणी प्रवेश मिळेल म्हणून महाविद्यालयामंध्ये प्रवेश घेण्यास अनेकांनी उशीर केला, त्याचा आता त्यांना चांगलाच फटका बसला आहे.