उरण-जेएनपीटीमध्ये वाहनांचा अडथळा सुरूच
रस्त्याच्या कडेला, बेकायदा गोदामांच्या बाहेर अवजड वाहनांच्या होणाऱ्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी तसेच अपघाताचेही प्रमाण वाढल्याने येथील विविध सामाजिक संस्थांनी तसेच सर्वपक्षीयांनी उरण व जेएनपीटी परिसर नो पार्किंग झोन करण्याची मागणी लावून धरली होती. त्यानुसार वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी अधिसूचना काढून उरण परिसर नो पार्किंग झोन घोषित केले आहे.
त्यानुसार रस्त्याच्या कडेला नो पार्किंगचे बोर्डही लावण्यात आलेले आहेत. मात्र वाहतूक विभागाचे आदेश झुगारून या परिसरात वाहतूक पोलिसांच्यादेखत राजरोसपणे बेकायदा पार्किंग सुरूच आहे. त्याचप्रमाणे जासई पोलीस ठाण्याच्या नजरेत येणाऱ्या उरण -पनवेल रस्त्यावरील चढणीवर असलेल्या बेकायदा गोदामात जाणाऱ्या कंटेनर वाहनांमुळे चढणीवरील अर्धा रस्ता व्यापला जात असल्याने अपघाताची शक्यताही वाढली आहे.
सिडकोच्या द्रोणागिरी नोड परिसरात नियमांपेक्षा कितीतरी जास्त अक्षरश: शेकडो अवजड कंटेनर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या असतात. तसेच अनेक कंटेनर रस्त्याच्या कडेला अनेक दिवस उभी असतात. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या एस.टी. बसेस तसेच दुचाकी व खाजगी चारचाकी वाहनांना तासन्तास वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या विरोधात येथील नागरिकांनी अनेक वेळा अर्ज, विनंत्या, निवेदन व आंदोलनेही केली. आंदोलनेही केली आहेत.
त्याची दखल घेत नवी मुंबई वाहतूक विभागाने उरण, पनवेल तसेच जेएनपीटी परिसरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावर किंवा रस्त्यालगत वाहनांची पार्किंग केल्यास कारवाई करण्यासाठी नो पार्किंग झोन जाहीर करण्यासाठी अधिसूचना जाहीर करून त्यावर येथील जनतेच्या हरकती मागविल्या होत्या.
आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्याने नागरिकांची गरसोय टाळण्यासाठी वाहतूक विभागाने नो पार्किंग झोन जाहीर केले असले तरी वाहतूक पोलिसांच्या देखतच करळ, जासई, शंकर मंदिर, नवघर, पागोटे, भेंडखळ आदी ठिकाणच्या मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावरही पार्किंग सुरूच आहे.