सप्तश्रंग देवस्थानच्या भूमिकेने भाविकांमध्ये नाराजी
साडेतीन शक्ती पीठापैकी एक असलेल्या दिंडोरी तालुक्यातील सप्तश्रृंग गडावरील मंदिरासमोरील सभा मंडपात माकडांचा उच्छाद वाढला असून भाविकांना दर्शन घेण्याआधी या माकडांना वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ जणूकाही शुल्क स्वरूपात द्यावा लागत आहे. देवस्थान व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांकडून माकडांचा बंदोबस्त करण्याऐवजी उलट भाविकांनाच योग्य वागणुकीचा सल्ला देण्यात येऊन ‘माकडांकडून होणारे हे प्रकार नैसर्गिक आपत्ती’ असल्याचा अजब शोध लावत आहेत. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या भाविकांना आता तक्रार करावी तरी कुठे, असा प्रश्न पडला आहे. त्यातच गडावरील सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असताना या नवीन त्रासाची त्यात भर पडली आहे.
गडावर माकडांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यांच्याकडून भाविकांना होणारा त्रास ही काही आजची समस्या नाही. काही वर्षांपूर्वी या माकडांना आवरण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडली होती. परंतु काही दिवसानंतर त्यांचा त्रास पुन्हा सुरू झाला आहे. भाविकांच्या हातातील सामान हिसकावणे, हातातील पिशवी लपविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चावा घेणे, गर्दीत घुसणे, भाविकांकडून हिसकावलेल्या सामानावरून माकडांमध्ये होणारी झटापट, महिला व मुलांमध्ये त्यामुळे होणारी घबराट, हे सर्व प्रकार व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत होत असतात. तरीही ते केवळ बघ्याची भूमिका घेतात. बऱ्याच वेळा सुरक्षारक्षकच गायब असतात. सोमवारीही माकडांनी असाच उच्छाद मांडल्यावर गाभाऱ्यात उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकांकडे भाविकांनी हुसकाविण्याची विनंती केली असता सुरक्षा रक्षकाने भाविकांनाच दटावले. माकडांचा प्रकार हा नैसर्गिक आपत्ती असल्याचे सांगत त्यांनी उलट भाविकांनाच शांत केले. न्यासाच्या व्यवस्थापकांकडे काही जणांनी मोबाईलवरून संपर्क साधत या प्रकाराची माहिती दिली असता त्यांनीही कर्मचाऱ्यांची री ओढली. सुरक्षारक्षक म्हणतो तेच बरोबर असल्याचे त्यांनी सांगितल्याने भाविकांना माकडांचा त्रास सहन करण्याशिवाय काही गत्यंतरच उरले नाही.
भाविकांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याऐवजी आपलेच म्हणणे पुढे दामटणाऱ्या व्यवस्थापनाने आपल्या कार्यशैलीत बदल करण्याची सूचना काही भाविकांनी केली आहे. माकडांचे प्रकार ही नैसर्गिक आपत्ती आहे असे मानून त्यांना हुसकावण्यासाठी कोणतीही कार्यवाही न करण्याची व्यवस्थापनाची भूमिका कितपत योग्य आहे, असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे.
हैदराबाद येथील बॉम्बस्फोटानंतर देशात सर्वत्र ‘हाय अलर्ट’ चा इशारा दिला असताना गडावरील सुरक्षा व्यवस्था अत्यंत तोकडी आहे. त्यातच भाविकांच्या नाराजीकडे दुर्लक्ष केले जात असेल तर ही सुरक्षा व्यवस्था कशी आहे, तेही दिसून येते.  गंमत म्हणजे मागील सोमवारी सुरक्षेच्या कारणास्तव पहिल्या पायरीवरून पुढे नारळ घेवून जाऊ देण्यात येत नव्हते, परंतु परतीच्या पायऱ्यांवरून भाविक सर्व सामान वर घेऊन जात होते. त्यांची तपासणी करण्यासाठी तेथे कोणीही सुरक्षारक्षक नव्हता. याच मार्गावरून गाढवेही येत होती. त्यापैकी एखाद्या गाढवाने गर्दीत शिरून धुमाकूळ घातला तर भाविकांची किती धावपळ उडेल, या सर्व कारणांचा व्यवस्थापनाने कोणताही विचार केलेला दिसून येत नाही.