News Flash

हातेकर सरांचा असाही तास!

आपण निव्वळ विद्वान अर्थशास्त्रज्ञ नाही तर तत्वांसाठी प्रसंगी वाट्टेल ती किंमत मोजण्याचीही आपली तयारी आहे, हे मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक नीरज हातेकर यांनी सप्रमाण सिद्ध केले

| February 5, 2014 08:05 am

आपण निव्वळ विद्वान अर्थशास्त्रज्ञ नाही तर तत्वांसाठी प्रसंगी वाट्टेल ती किंमत मोजण्याचीही आपली तयारी आहे, हे मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक नीरज हातेकर यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. मात्र अर्थशास्त्रासारखा रुक्ष विषय शिकवणाऱ्या, या कणखर वृत्तीच्या आणि ताठ कण्याच्या प्राध्यापकाचा एक सुंदर, नाजुक आणि भावुक कोपराही आहे. पदवी अथवा पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवताना हातेकर सर जेवढे रंगून जातात तेवढेच अगदी १ ली, २ रीतील बालगोपाळांनाही शिकवताना समरसून जातात, हे रविवारी गोरेगावातील छोटे कंपनी, त्यांचे आईबाबा आणि आजीआजोबांनीही अनुभवले.
गोरेगावत गेली सुमारे १५ वर्षे नियमितपणे दर रविवारी ‘अत्रे कट्टा’ चालविणाऱ्या गानू काकांनी हातेकर सरांना कट्टय़ावर बोलावले होते. ‘अर्थशास्त्र’, ‘विद्यापीठाचे प्रशासन’, ‘विद्यापीठातील गैरकारभार आणि त्याविरुद्धचा लढा’ असल्या रुक्ष विषयांवर हातेकर सर येथे बोलणार नव्हते. तर चक्क पाळीव पोपट, बिन शेपटीचे उंदीर, ससे, मांजरी, कुत्री अशा आबालवृद्धांना आवडणाऱ्या विषयाचे भांडारच ते घेऊन आले होते.
हातेकर सरांनी सोबत १०-१२ विविध जातींचे देशी-परदेशी पोपट आणले होते. आपल्या हातावर पोपटाला बसवून ते हळूच समोर बसलेल्या छोटय़ांच्या समोर जाऊन उभे राहात. त्यांच्या डोळ्यातील भाव पाहून स्वत:च त्यांना पोपटाला पंखावरून हात फिरवण्यास सांगत. ही गंमत सुरू असतानाच या पोपटाचे वय किती, ते कसे ओळखावेत, पोपटाचा जीवनक्रम कसा असतो, त्याच्या सवयी काय असतात अशी विविध प्रकारची मनोरंजक माहितीही ते देत होते. त्यांच्यासोबत स्वित्र्झलडमधील कुत्राही होता. बर्फात अडकलेल्या माणसांचा शोध घेऊन, बर्फ उकरून आणि प्रसंगी बेशुद्ध पडलेल्यांना पंजात धरून खेचून आणण्याचे कामही हा कुत्रा करतो, असे हातेकरांनी सांगताच समोर बसलेल्यांचा आ वासला गेला. तीन साडेतीन फुटांच्या या कुत्र्याला हात लावून बघण्याचा मोह आजीआजोबांनाही आवरत नव्हता. या प्राणीपक्ष्यांच्या प्रदर्शनाबरोबरच प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेतील उत्तरे सर देत होते. स्वाभाविकच कट्टा संपतांना आजीआजोबांपासून नातवांपर्यंत सगळ्यांनाच एक तृप्त अनुभव मिळालेला होता.
एरवी अत्रे कट्टा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची बैठक समजली जाते. पण या रविवारी जयप्रकाश नगरातील जयप्रकाश उद्याने छोटय़ांच्या आवाजाने गजबजून गेले होते. गंमत म्हणजे हातेकर सर आपला सगळा ‘जामानिमा’ घेऊन वेळेच्या अर्धा तास आधीच हजर होते. साध्या टी शर्ट- पँटमधील हातेकर सर आपण कोणीतरी मोठ्ठे प्राध्यापक आहोत हे दुरान्वयानेही कोणाला जाणवू देत नव्हते. बच्चे कंपनीला तर त्यांचे मोठेपण सांगूनही समजले नसते एवढय़ा सहजतेने ते त्यांच्यात समरसून गेले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2014 8:05 am

Web Title: prof neeraj hatekar lectures
Next Stories
1 सुनील बर्वे आणि सोनाली खरेची ‘बे दुणे दहा’
2 अलिबाग, गणपतीपुळे, अष्टविनायक दर्शनासाठी एसटीच्या विशेष सहली
3 मोनोरेल : उत्साह ओसरला?
Just Now!
X