संस्कृतचे गाढे अभ्यासक व लातूरचे सुपुत्र प्राचार्य हरिश्चंद्र रेणापूरकर यांना संस्कृत भाषेच्या विपुल लेखन कार्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते महाऋषी बद्रायण व्यास पुरस्कार देऊन अलीकडेच गौरवण्यात आले.
पाच लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लातूर जिल्हय़ातील रेणापूर येथे जन्मस्थळ असलेल्या रेणापूरकर यांनी संस्कृत भाषेत प्रचंड लिखाण केले. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रातील शासकीय महाविद्यालयांत संस्कृत विभागप्रमुख व प्राचार्य म्हणून काम केले. गुलबग्र्याच्या मराठी साहित्य मंडळाचे १२ वष्रे अध्यक्ष, काशीच्या विश्वसंस्कृत प्रतिष्ठानचे मंत्री, तसेच कर्नाटकातील आर्य प्रतिनिधी सभा बंगरूळचे उपप्रधान अशी पदे त्यांनी भूषविली. मराठीतही २० हजारांच्या आसपास श्लोकांचे लेखन केले आहे. हैदराबाद मुक्तिसंग्रामातही ते सक्रिय होते.
नवकवींच्या जमान्यात रेणापूरकरांनी अक्षरवृत्तात व विविध छंदांत अनेक विषय हाताळले. महर्षी दयानंद, स्वामी विवेकानंद, लाला लजपतराय, वीर सावरकर, महात्मा गांधी, पंडित नेहरू, लालबहादूर शात्री अशा नेत्यांवर त्यांनी ओजस्वी कविता लिहिल्या. आणीबाणीवर ‘इंदिरा पततोत्थानम्’ नावाचे २३० श्लोकांचे ऐतिहासिक काव्य मंदाकांतावृत्तात लिहिले. काव्योन्मेष, रामजन्मभूमी विवाद, आर्यसमाज गौरवम्, कश्मीर क्रूरम् आदी विषयांवर संस्कृतमध्ये लिखाण केले. त्यांच्या नावावर ११ संस्कृत पुस्तके आहेत.
प्राचार्य रेणापूरकरांना संस्कृतमधील असामान्य योगदानाबद्दल राज्य सरकारच्या वतीने महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार, पुणे मनपाच्या वतीने ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व व उत्तर प्रदेश सरकारनेही साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांच्या साहित्यावर ४ प्राध्यापक विविध विद्यापीठांत पीएच.डी. करीत आहेत. देशातील २५ विद्यापीठांनी त्यांच्या संस्कृतच्या कार्याबद्दल त्यांना गौरविले आहे.