व्यावसायिक शिक्षण हे अन्य शिक्षणासोबतच जीवन मूल्यांचा विकास करण्यास सहायक आहेत, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉ. रवींद्र जोशी यांनी केले.
उत्तर अंबाझरी मार्गावरील धरमपेठ विज्ञान महाविद्यालयातील व्यवसाय शिक्षण विभागाला (एम.सी.व्ही.सी.) २५ वर्षे होत असल्याबद्दल या विभागातून शिक्षण घेतलेल्या व विविध व्यवसाय करीत असलेल्या विद्यार्थ्यांची ‘यशोगाथा’ एका पुस्तकाद्वारे प्रसिद्ध होत आहे. यानिमित्त महाविद्यालयात आयोजित समारंभात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण विभागाचे एस.व्ही. राठोड, प्राचार्या डॉ. आशा भाटे, डॉ. अपराजित तसेच व्यावसायिक विभागाचे प्रमुख डॉ. युगल रायलू उपस्थित होते. व्यवसाय शिक्षणाशी जुळलेल्या लोकांनी या उपक्रमाला आपल्या हाती घेतले आहे. व्यवसाय शिक्षणाला शिक्षण विभागाचे अधिकारी आपले प्रोत्साहन देत आहे. पुस्तक रूपाने प्रकाशित होणाऱ्या ‘यशोगाथा’ मुळे व्यावसायिक शिक्षणाचे खरे स्वरूप समाजासमोर येईल, अशी अपेक्षा एस.व्ही. राठोड यांनी व्यक्त केली.
डॉ. युगल रायलू यांनी प्रास्ताविकातून ही बाब नागपूर विभागासाठी गौरवास्पद असल्याचे सांगून अन्य विभागानेही असा उपक्रम सुरू करावा, असे स्पष्ट केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘यशोगाथा’ प्रसिद्धी फलकाचे अनावरण करण्यात आले. संचालन यशोगाथा समितीचे कोषाध्यक्ष प्रा. अतुल मोघे यांनी तर सचिव संजय विसपुते यांनी आभार मानले.
यावेळी प्रा. शशीमोहन जोशी, प्रा. राजेंद्र क्षीरसागर, सरिता पानसे, प्रा. दिनेश गुल्हाने, सुधीर हंबर्डे प्रामुख्याने उपस्थित होते.