मराठी भाषा आणि मराठीकरणाच्या चळवळीसाठी गेली काही वर्षे चळवळी आणि आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करणाऱ्या मराठी अभ्यास केंद्राची बैठक येत्या ७ एप्रिल रोजी दादर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संस्थेच्या कामाचा लेखाजोखा आणि पुढील आंदोलनांची माहिती देण्यात येणार आहे. राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे स्थापन करण्यात आलेला मराठी भाषा विभाग, बॅचलर इन मास मिडियाचा अभ्यासक्रम मराठीतून करणे, विविध बॅंका, एटीएम केंद्र येथील व्यवहार मराठीतून होण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली पाठपुरावा करणे, जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालयात शंभर टक्के मराठीचा वापर होण्यासाठी प्रयत्न, मराठी शाळांच्या मान्यतेचा लढा, संगणकावर युनिकोडच्या आधारे मराठीच्या वापरासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणे आदी चळवळ आणि उपक्रमातून मराठी अभ्यास केंद्राने मराठी भाषा, संस्कृती यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले.
ही सर्व माहिती जास्तीत जास्त मराठीप्रेमी मंडळींपर्यंत पोहोचविणे, केंद्राच्या आगामी प्रकल्पांची माहिती देणे आणि लोकांच्या सहभागातून उभारण्यात येणाऱ्या आंदोलनांची माहिती देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. दामले सभागृह, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय इमारत, नायगाव, दादर (पूर्व) येथे सकाळी ११ ते ४ या वेळेत ही बैठक होणार आहे.केंद्राचे हितचिंतक, सभासद आणि मराठी अभ्यास केंद्राच्या कामात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मराठीप्रेमी मंडळींनी मोठय़ा संख्येने या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी आनंद भांडारे यांच्याशी ९१६७१८१६६८ या क्रमांकावर संपर्क साधावा.