डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय विद्यापीठ विद्यार्थी कौशल्य विकास कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्या (शुक्रवारी) होणार आहे. तत्पूर्वी सकाळी साडेअकरा वाजता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात वंदेमातरम व हज हाऊससंबंधीची बैठक होणार आहे. या दौऱ्यात दुपारनंतर मुख्यमंत्री हे पालोदकरांच्या निवासस्थानीही जाणार असल्याचा उल्लेख अधिकृत दौऱ्याच्या कार्यक्रमात आहे.
विद्यापीठ वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री डी. पी. सावंत, राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेचे अध्यक्ष एस. रामदुराई व अनिता राजन, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सचे संचालक प्रा. एस. परशुरामन, कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे आदींची उपस्थिती असेल. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आर्थिक साक्षरता कार्यक्रमाचेही उद्घाटन होणार आहे. विद्यापीठ नाटय़गृहात हा कार्यक्रम होईल. वर्धापनदिनानिमित्त सकाळी साडेदहा वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांचे ‘उच्च शिक्षण, आजची स्थिती आणि आव्हाने’ या विषयावर व्याख्यान होईल. दुष्काळामुळे चर्चेतून काहीसा मागे पडलेला विषय नव्याने चर्चेत आला असून हज हाऊस व वंदेमातरम सभागृहाच्या जागा निश्चितीसाठी सकाळी साडेदहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होणार आहे.