महाराष्ट्र-आंध्र सीमेवरील धर्माबाद तालुक्यातल्या बाभळी येथे बांधलेल्या बंधाऱ्याच्या जलपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री सुनील तटकरे उद्या (मंगळवारी) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे दुपारी २ वाजता आगमन होईल. अडीच वाजता बाभळी बंधाऱ्याचे जलपूजन होणार आहे. पालकमंत्री डी. पी. सावंत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवनाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा होणार आहे. दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा होणार आहे. नियोजन भवनाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नवा मोंढा येथे काँग्रेसची जाहीरसभा होणार आहे. वचनपूर्ती सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अन्य सर्व निमंत्रितांसाठी आमदार अमर राजूरकर यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. उस्मानाबाद, लातूर येथील अधिकारी बंदोबस्तासाठी नांदेडमध्ये दाखल झाले आहेत.