हिवाळ्यातच दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असतानाच निफाड तालुक्यात वीज वितरण कंपनीने शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे काम सुरू केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आ. अनिल कदम यांनी मतदारसंघातील गोदाकाठ भागातील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत दौरा करून परिस्थिती जाणून घेतली.
ओझर उपविभागाचे उपअभियंता, शाखा अभियंता यांच्यासह चांदोरी, चाटोरी, बेरवाडी, सायखेडा, सोनगाव, औरंगपूर व म्हाळसाकोरे गावात दौरा करण्यात आला. यावेळी प्रत्येक गावातून तक्रारींचा पाऊस पडला. तीन हॉर्सपॉवर ऐवजी पाच हॉर्स पॉवरची बिले, ट्रान्सफार्मर वेळत मिळत नाही, कोटेशन भरून एक-दोन वर्ष झाली तरी विद्युत जोडणी नाही, सिंगल फेज योजना कार्यान्वित नाही, जळालेले वीजमीटर पैसे भरूनही मिळत नाही, शाखा अभियंते, वायरमन कधीही भेटत नाहीत, वायरमनच खासगी व्यक्तीकडून कामे करून घेतात, पैशाशिवाय ट्रान्सफार्मर न देणे, विद्युत टेकेदाराकडून नवीन पुरवठय़ाची कामे न होणे, असा तक्रारींचा सूर होता.
सायखेडा येथील दामोधर कुटे यांनी १९८६ मध्ये वीज जोडणीसाठी कोटेशन भरले असून अद्यापही विद्युत जोडणी नाही. चाटोरी येथील अनुसया हांडगे या महिलेस प्रतिमाह १०० रुपये बील येत असे, ते सात हजार रूपये आले, अशा तक्रारींमुळे आमदारही अवाक झाले. दुष्काळाच्या छायेत शेतकरी होरपळत असताना शासनाकडून अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी काही ठोस निर्णय झालेला नाही. शासन शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा विद्युत पुरवटा खंडित केल्यास अधिकाऱ्यांना गय केली जाणार नाही, असा इशारा आ. कदम यांनी दिला. अगोदर भारनियमन बंद करून वीज पुरवठा, सुरळीत करावा, कृषी संजीवनी योजनेतील बिले भरून घेतले मात्र त्यावरील व्याज माफ केले नाही. वीज कंपनीच्या या अनागोंदी कारभाराचाही आ. कदम यांनी निषेध केला.