शहर परिसरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांनी आरोग्य तपासणी, छायाचित्र स्पर्धा, मुलांना चित्रपट दाखविणे यांसह विविध उपक्रमांचे आयोजन करून बालदिन साजरा केला. या कार्यक्रमांच्या माध्यमातून पंडित नेहरू यांना जयंतीनिमित्त अभिवादनही करण्यात आले.
अभिनव लेडीज ग्रुपची छायाचित्र स्पर्धा
अभिनव लेडीज ग्रुपच्या वतीने बालमुद्रा छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रोहन सोनवणे, गौरव देवरे यांनी परीक्षण केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नितीन मुलतानी, श्रध्दा लुणिया, लिला तांबट उपस्थित होते. प्रास्तविक रजनी जातेगांवकर यांनी केले. हेमा झंवर यांनी आभार मानले. स्पर्धेत ४०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. लहान गटात आर्वी तांबट, राघव जोशी, अर्चित तांबट विजेते ठरले. मोठय़ा गटात आराध्य पुराणिक, आरव पलोड, दुवा प्रभुदेसाई पहिल्या तीनमध्ये विजेते ठरले
इंडियन रेडक्रॉसतर्फे सुदृढ बालक स्पर्धा
नाशिक येथे इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित सुदृढ बालक स्पर्धेचे पारितोषिक वितरण आ. देवयानी फरांदे, ब्रिगेडियर अरविंद वर्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. स्पर्धेत ११५ पेक्षा अधिक बालकांनी सहभाग नोंदविला. पहिल्या गटात मल्हार किरवे, देविशा अहिरे, आकाश पाठक, विभांशु ढोमसे, मल्हार महाजन, दुसऱ्या गटात आदिराज शिंदे, आयान मुजावर, श्रध्दा कुलथे, अथर्व सूर्यवंशी, संस्कृती बेलगांवकर यांचा समावेश आहे. डॉ. निरव पटेल, डॉ. अभिजीत कोरडे, डॉ. तेजस राणे, डॉ. ओकांर गलांडे यांनी परीक्षण केले.
नाशिक येथील ओम त्र्यंबकराज बालकाश्रमात बालदिन सप्ताहानिमित्त आणि ‘चाईल्ड से दोस्ती’ उपक्रमातंर्गत समाजकार्य महाविद्यालय व नवजीवन फाऊंडेशन संचलित चाईल्डलाईनतर्फे कार्यक्रम साजरा करण्यात आला. चाईल्डलाईनच्या शहर समन्वयक प्रणिता तपकिरे, केंद्र समन्वयक प्रविण आहेर, बालगृहाचे अधीक्षक परमदेव अहिरराव यावेळी उपस्थित होते. यावेळी आहेर यांनी मुलांना चाईल्डलाईनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तपकिरे यांनी बालहक्क आणि जीवनात येणाऱ्या समस्यांना कसे तोंड द्यावे याबद्दल मार्गदर्शन केले. यानंतर मुलांना बालहक्क व लैगिक शोषण या विषयावर व्हिडिीओ क्लिप दाखविण्यात आली. मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मुलांना अनेक भेटवस्तु यावेळी देण्यात आल्या.
सुभाष वाचनालय
जुने नाशिक परिसरातील सुभाष सार्वजनिक वाचनालयात ग्रंथालय सप्ताहाचे उद्घाटन, जवाहरलाल नेहरू जयंती व बालदिन असे कार्यक्रम संयुक्तरित्या घेण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक वेणूनाथ क्षीरसागर उपस्थित होते. वाचन संस्कृती जतन करण्यासाठी वाचनालयाने कटीबध्द व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. इंग्रजी माध्यमांच्या शाळा व मनोरंजनाची वाढती साधने वाचन संस्कृती ऱ्हास करत आहे. तरूण वर्ग समाज माध्यमांमध्ये गुंग होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कामगार कल्याण केंद्राच्या बालवाडीतील बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले. ग्रंथपाल दत्ता पगार यांनी सूत्रसंचालन केले. मारूती तांबे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. कार्याध्यक्ष परमानंद पाटील यांनी स्वागत केले. सहकार्यवाह शंकर बर्वे यांनी आभार मानले.
सारडा कन्या शाळा
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सारडा कन्या विद्यालयात बालदिन विविध उपक्रमांनी साजरा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक प्रदिप कुलकर्णी, सुनंदा जगताप आणि संध्या जोशी उपस्थित होते. मुख्याध्यापिका सविता खरे आणि आशा डावरे अध्यक्षस्थानी होते. आरोही नातू, सुखदा बोराडे, केतकी गुजराथी यांनी नेहरू यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. साक्षी जाधव, प्रियंका पवार यांनी बालमजुरीवर आधारित नाटक सादर केले.
सायली ताडगेने नेहरूंची पत्रकार परिषद सादर केली. यानिमित्त प्रश्नमंजुषा घेण्यात आली. अनुष्कार कंरजे हिने प्रास्ताविक केले. संगीत शिक्षक ओकांर वैरागर यांनी गाणी सादर केली. संस्कृती जाधव व साक्षी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. श्रध्दा चव्हाणने आभार मानले.
मुलांसाठी ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ चित्रपटाचा शो
नाशिकमधील निराधार, वंचित बालकांना महापुरूषांचे चरित्र अनुभवता यावे यासाठी ‘व्हाईस ऑफ चॅम्प्स’ या ग्रुपतर्फे निरीक्षण गृहातील बालकांना तर, सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज अभियानातंर्गत अनाथालय, आधारतीर्थ आधाराश्रम आणि महापालिकेच्या सातपूर शाळेतील मुलांना ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे द रियल हिरो’ हा चित्रपट दाखविण्यात आला.
प्रकाश आमटे यांचे कार्य बालकांसमोर यावे, त्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी या उद्देशाने हा चित्रपट मुलांना दाखविण्यात आला. यावेळी चंदुलाल शाह, हितेश शाह, अभिजीत मोदी, आनंद साखला आदी पदाधिकारी उपस्थित होते. दिव्या मल्टिप्लेक्समधील चित्रपटाप्रसंगी सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, उपाध्यक्ष डॉ. उत्तम फरताळे, त्र्यंबकराव गायकवाड, मुख्याध्यापक कैलास ठाकरे आदी उपस्थित होते.
लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय
लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छ भारत’ नावाची प्रतिकृती सादर करत ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ असा नारा दिला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मनिषा पलोड यांच्या हस्ते नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य शि. ना. मवाळ यांनी महाविद्यालय परिसराबरोबरच आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रंथालय, प्रयोगशाळा, स्वयंपाकगृह, नाटय़गृह व महाविद्यालय परिसर स्वच्छ केला.
फ्रावशी अकॅडमी
नाशिक येथील फ्रावशी अकॅडमीत बालदिनानिमित्त सर्वधर्मसमभाव कार्यक्रम साजरा करण्यात आला. समूहगायन, नृत्याद्वारे मुलांच्या मनात राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविण्यात आली.
शाळेचे अध्यक्ष रतन लथ यांनी मुलांना राष्ट्रीय एकात्मतेसह स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमास रतन लथ, शर्वरी लथ, विश्वस्त सचिव मेघना बक्षी, सचिन पाठक आदी उपस्थित होते.
उन्नती विद्यालय
नाशिक येथील उन्नती प्राथमिक विद्यालयात बालदिनी शाळा व परिसर स्वच्छ करण्यात आला. संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. प्रवीण अमृतकार, शालेय समिती अध्यक्ष सतीश मुसळे यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी चाचा नेहरू यांचा पेहराव केला होता. मुख्याध्यापक नंदलाल धांडे यांचा सत्कार करण्यात आला. सुषमा कुंभारे यांनी चाचा नेहरू यांच्याविषयी माहिती दिली.