‘मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी’ असे बिरुद लावून सध्या अनेक प्रकल्प अनेक संस्था राबवित आहेत. मेट्रो रेल्वे, मोनो रेल्वे, उड्डाणपूल, नवीन रस्ते असे अनेक प्रकल्प सध्या मुंबईभर सुरू आहेत. त्यामुळे रस्तोरस्ती खड्डे, सिमेंटची धूळ, मिक्सरचा गोंगाट आणि वाहतुकीचे तीनतेरा असे दृश्य गेले दशकभर आहे. मात्र या वर्षांत या चित्रात बराच फरक पडेल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. परंतु हा आशावाद वास्तवात खरेच रूपांतरीत होईल का, ही शंका सर्वसामान्यांच्या मनात घर करून आहे.

*  मेट्रो रेल्वे- सुरक्षिततेच्या चाचण्यांचे आव्हान
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या ११.४० किलोमीटर लांबीच्या मार्गावरील मेट्रो रेल्वेही या वर्षी सुरू होईल, असा दावा करण्यात येत आहे. मेट्रो रेल्वेच्या मार्गाचे बांधकाम मे २०१३ पर्यंत पूर्ण होईल. नोव्हेंबर-डिसेंबर २०१३ पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. एकावेळी ११७८ प्रवासी चार डब्यांच्या वातानुकूलित मेट्रो रेल्वेमध्ये अवघ्या २१ मिनिटांच्या आरामादायी प्रवासात हे अंतर कापतील. सध्या रस्ता पूर्ण मोकळा असला तरी सुमारे पाऊण तास प्रवासासाठी लागतो. पण हा वर्दळीचा मार्ग असल्याने अनेकदा वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे आणखी हाल होतात. त्यामुळे मेट्रो रेल्वे या मार्गावर नित्यनेमाने प्रवास करणाऱ्या हजारो लोकांना मोठा दिलासा ठरणार आहे. मात्र, मेट्रो रेल्वेच्या मार्गाचे बांधकाम अद्याप सुरू आहे. शिवाय बांधकाम संपल्यानंतर बांधकाम सुरक्षित असल्याबाबतची चाचणी, त्याचे प्रमाणपत्र ही सारी प्रक्रिया सुरू होईल. याचबरोबर बांधकामाची खात्री पटल्यानंतर मेट्रो रेल्वेच्या चाचण्या सुरू होतील. वडाळा-चेंबूर या पहिल्या टप्प्यात धावणाऱ्या मोनोरेलचा मार्ग पूर्ण झाल्यानंतरही  बांधकामाची चाचणी, मार्गाची चाचणी अशा विविध परीक्षांसाठी मोनोरेल गेले वर्षभर धावतच आहे. अद्यापही मोनोची त्रिस्तरीय सुरक्षा चाचणी प्रक्रिया संपायची आहे. मोनोचा हा अनुभव पाहता मेट्रोबाबतही तितक्याच सावधगिरीने चाचण्या करण्यात येतील हे निश्चित. त्यामुळे मेट्रो रेल्वे डिसेंबर २०१३ पर्यंत धावण्याचा दावा कितपत सत्यात उतरेल याबाबत शंकेला वाव आहे.

* पूर्व मुक्त मार्गात भूसंपादनाचा अडथळा
दक्षिण मुंबईला थेट पूर्व उपनगरांशी जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेला १७ किलोमीटर लांबीचा पूर्व मुक्त मार्ग प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प एप्रिल २०१३ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल. पण फक्त पांजरापोळपर्यंत. संपूर्ण प्रकल्प मार्गी लागण्यात भूसंपादनाचा अडथळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाजवळील ऑरेंज गेट ते आणिक व आणिक ते पांजरापोळ असा एकूण १४.५ किलोमीटर लांबीचा प्रमुख टप्पा एप्रिल २०१३ अखेपर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल. पांजरापोळ ते घाटकोपर या २.५ किलोमीटर लांबीच्या अंतिम टप्प्याचे काम मात्र भूसंपादनाच्या कचाटय़ात आहे. प्रकल्पासाठी एक जागा हवी असून त्याबाबत वाद आहेत. जागा अद्याप हातात आली नसल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणही हतबल आहे.

* सहार उन्नत मार्ग-टर्मिनलच्या जोडरस्त्याचा प्रश्न
पश्चिम द्रुतगती महामार्गावरून आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जलदगतीने जाण्यासाठी बांधण्यात येत असलेला सहार उन्नत मार्ग प्रकल्प दोन वर्षांपासून रखडला आहे. २०१२ मध्ये हा सुमारे दोन किलोमीटर लांबीचा (१.८ किलोमीटर) प्रकल्प पूर्ण होणार व त्यासाठी २८८ कोटी रुपये खर्ची पडणार, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने जाहीर केले होते. पण प्रकल्प रेंगाळला. आता त्याचा खर्च ३४५ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हा प्रकल्प उभारत असले तरी आंतरराष्ट्रीय टर्मिनलपर्यंत जाणारा जोडरस्ता ‘मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लि.’च्या अखत्यारित आहे. हा जोडरस्ता अद्याप झालेला नाही. शिवाय प्राधिकरणाच्या अखत्यारीतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरून उन्नत मार्गाकडे जाणाऱ्या भुयारी रस्त्याचे काम बाकी आहे. प्रकल्प पूर्ण होण्याच्या मुहूर्ताबाबत आजवरचा अनुभव पाहता आताही वर्षांच्या शेवटी हा प्रकल्प होण्याचा अंदाज कितपत खरा ठरेल याबाबत शंका आहे.