१६ व १७ जानेवारी १९८४ साली झालेल्या उरणच्या शौर्यशाली शेतकरी लढय़ातील पाच हुतात्म्यांना शुक्रवारी जासई येथील हुतात्मा स्मारकात पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेटनी मानवंदना दिली. या वेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह विविध पक्षाच्या बडय़ा राजकीय नेत्यासह कार्यक्रमाला अवघ्या शंभराची उपस्थिती असल्याने अल्प उपस्थितीमुळे शौर्यशाली लढय़ाची शोकांतिका झाल्याची चर्चा परिसरात होती. तीस वर्षांतच शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी छातीवर गोळ्या झेलणाऱ्या हुतात्म्यांचे प्रकल्पग्रस्तांना विस्मरण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे नेते दिवंगत माजी खासदार दि. बा.पाटील यांच्या नेतृत्वात तीस वर्षांपूर्वी लढल्या गेलेल्या शेतकरी आंदोलनातील हुतात्म्याचे जासई येथे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकात मागील तीस वर्षांपासून दिबांनी स्थापन केलेल्या महात्मा फुले सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हुतात्मा दिन साजरा केला जातो. या हुतात्मा दिनाला उरण-पनवेल मधील आजी-माजी आमदार, खासदार तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहतात. या वर्षीही नेते मोठय़ा संख्येने उपस्थित होते, मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची उपस्थिती नव्हती.  जासई येथील शुक्रवारी झालेल्या हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमासाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, आमदार मनोहर भोईर, आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील, दिनेश पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे व सामाजिक संस्थांचे नेते उपस्थित होते. या वेळी मंचावर आंदोलनाचे नेते दि. बा. पाटील यांचे आसन राखीव ठेवून हा कार्यक्रम पार पडला.
उरण शेतकरी आंदोलनाचे नेते दिवंगत माजी खासदार दि.बा.पाटील यांनी आपल्या हयातीतच शेतकरी आंदोलनाच्या हुतात्म्यांना आदरांजली वाहन्यासाठी प्रकल्पग्रस्त अल्प प्रमाणात येत असल्याने हुतात्मा दिनाचा जासई येथील कार्यक्रम बंद करण्याची सूचना दिबांनी त्यांच्या हयातीतच केली होती.