न्याय द्या, प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडू नका, आमची नगरी नवी मुंबई नगरी, अशा घोषणा देत नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या पालिकेच्या नोकरभरतीत व फेरीवाला धोरणात प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के आरक्षण, गरजेपोटी बांधलेल्या घरांना आकारण्यात येणारा तिप्पट मालमत्ता कर नियमित करण्यात यावा, पालिकेच्या रुग्णालयात प्रकल्पग्रस्तांना आरक्षण देण्यात यावे या मागण्या घेऊन एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीने मुख्यालयावर बुधवारी धडक दिली. तसेच पालिका आयुक्तांना आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन सादर केले.
प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडावर सिडको, एमआयडीसी, पाालिका या शासकीय संस्था उभ्या ठाकल्या आहेत. मात्र त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना आजवर नोकरीत सामावून घेण्यात आले नाही, या प्रकल्पग्रस्तांना चतुर्थश्रेणी कामगारांच्या भरतीत तरी निदान ५० टक्के आरक्षण देण्यात यावे आणि गावांमध्ये गरजेपोटी बांधण्यात आलेल्या तसेच वडिलोपार्जित घरांवर पालिका तिप्पट मालमत्ता कर आकारत आहे, तो रद्द करून नियमित कर घेण्यात यावा, अशी मागणी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. मूळचा नवी मुंबईकर असणारा भूमिहीन प्रकल्पग्रस्त स्वत:चा रोजगार करण्यासाठी परवाना देण्याची मागणी करीत आहे. परंतु त्यांना परवाने दिले जात नाहीत. त्यामुळे रोजगाराच्या वाटा खुंटल्या असून प्रकल्पग्रस्तांना अधिकृत फेरीवाले परवाने देऊन त्यांना हक्काचा रोजगार देण्यात यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. अनेक विकासकामांसाठी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. या जमिनीवर उभारण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या समारंभासाठी कोणतीही सवलत दिली जात नाही. त्यामुळे जमिनी देऊनही आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या लेखी निवेदनानंतर त्यांनी केलेल्या विविध मागण्यांसाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष राजेश पाटील यांनी दिली.   

मोर्चामध्ये सहभागी ज्येष्ठ नागरिकाचे निधन
प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने पालिका मुख्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गोपीनाथ धोंडू म्हात्रे असे ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून ते ८९ वर्षांचे होते. त्यांचे कुटुंब घणसोली गावामध्ये राहत असून, त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, दोन नातू असा परिवार आहे.