सिडको प्रकल्पग्रस्त संघटना व किसान सभा या दोन संघटनांच्या वतीने रविवारी दुपारी २ वाजता वायू विद्युत केंद्राच्या सभागृहात प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात उरणमधील सिडको बाधितांच्या आंदोलनाची घोषणा केली जाणार आहे.सिडको व शासनाने विविध आमिषे दाखवून नवी मुंबईसाठी उरणमधील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. आपल्या हक्कासाठी लढून उरणच्या पाच शेतकऱ्यांचे बलिदान दिले आहे. लढय़ाचा साडेबारा टक्केचा फायदा नवी मुंबई परिसरात काहींचा झाला असला तरी तो आजपर्यंत उरणमधील प्रकल्पग्रस्तांना झालेला नाही. १९९४ साली साडेबारा टक्केची घोषणा झाल्यानंतर सिडकोने साडेबारा टक्केविकसित भूखंडाचे वाटप करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांकडून मागील २० ते २३ वर्षांत अनेकदा कागदपत्रांचीच मागणी करीत वर्षे ढकलली आहेत. २००७ साली उरणमधील प्रकल्पग्रस्तांची शेवटची भूखंडाची सोडत काढण्यात आली होती. त्यानंतर एकाही भूखंडाची सोडत सिडकोने का काढली नाही, असा सवाल सिडको प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष भूषण पाटील यांनी केला आहे.या मेळाव्यात सिडकोच्या साडेबारा टक्केचे त्वरित वाटप करा, भूखंडावरील शेतकऱ्यांची बांधकामांवर कारवाई करू नका, कमी केलेले भूखंड प्रकल्पग्रस्तांना परत करा, प्रकल्पग्रस्तांची बांधकामे सभोवतालच्या जागेसह नियमित करा तसेच नवी मुंबई सेझच्या जागेवर उद्योग उभारून रोजगार निर्माण करा, आदी मागण्या या मेळाव्यात करण्यात येणार आहेत.