सिडकोमध्ये गेली पंधरा वर्षे कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले साफसफाई कामगार व गेली दोन वर्षे सेवेत असलेले अभियंते, वास्तुविशारद यांच्या आर्थिक शोषणाच्या विरोधात सिडको संघर्ष समितीने दोन दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केल्यामुळे सिडको प्रशासनाने या कामगारांच्या नेत्यांना शुक्रवारी चर्चेसाठी मुंबई येथे आवतण दिले आहे. सिडकोत १३०० साफसफाई कामगार व २८ अभियंते, वास्तुविशारद यांचे कंत्राटदाराकडून आर्थिक शोषण केले जात आहे. गुरुवारी सिडकोचे प्रशासक सुनील केंद्रेकर यांच्याबरोबर या उपोषणकर्त्यांची बैठक झाली.
सिडको स्थापनेला मार्च महिन्यात ४५ वर्षे पूर्ण होणार असून गेली ४५ वर्षांत टप्प्याटप्प्याने कर्मचारी व अधिकारी वर्ग सेवानिवृत्त झाला आहे. त्यामुळे सिडकोत कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. स्वच्छतेसारखी दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी सिडकोने खारघर, पनवेल या त्यांच्या क्षेत्रात कंत्राटदार नेमले आहेत. या कंत्राटदारांकडील कर्मचाऱ्यांना शासननिर्णयानुसार महिन्याला कमीत कमी १४ हजार ७०० रुपये पगार देणे क्रमप्राप्त आहे, पण कंत्राटदार त्याला कात्री लावून केवळ नऊ हजार रुपये या कामगारांच्या हातात टेकवत आहेत. महागाईच्या या काळात हे नऊ हजार एका दिवसात खर्च होत आहेत. याशिवाय या कामगारांच्या विम्याच्या पत्ता नाही.
या साफसफाई कामगारांप्रमाणेच उच्च शिक्षण घेऊन सिडकोत कंत्राटी पद्धतीने रुजू झालेल्या २८ अभियंते व वास्तुविशारदांची गत आहे. स्वर्गीय प्रकल्पग्रस्त नेते दि.बा. पाटील यांच्या आंदोलनामुळे सिडकोला दोन वर्षांपूर्वी हे अधिकारी सेवेत घ्यावे लागले होते. सिडको शंभर टक्के नोकरभरती ही प्रकल्पग्रस्तांची करू शकणार नाही असे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तसे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यामुळे सिडकोने या अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने सेवेत सामावून घेतले आहे.
त्यांना ३८ हजार रुपये पगार सांगण्यात आला आहे, पण त्यांच्या हातात केवळ २३ हजार रुपये पडत असून इतर सुविधांचा पत्ता राहिलेला नाही. त्यामुळे या दोन घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय मतभेद विसरून भाजपचे रामशेठ ठाकूर, शेकापचे विवेक पाटील, शिवसेनेचे मनोहर भोईर यांनी बुधवारी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषणाच्या ठिकाणी हजेरी लावली होती. कामगार आणि अधिकाऱ्यांच्या हितासाठी कामगार नेते श्याम म्हात्रे व डॉ. राजेश पाटील पुढे सरसावले असून त्यांनी या नेत्यांना एका व्यासपीठावर आणले होते.
सिडको मुख्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांनी साखळी उपोषण सुरू केल्याने सिडको प्रशासनाने गुरुवारी केंद्रेकर यांना किल्ला लढविण्यास सांगितले होते. शुक्रवारी सिडकोचे भाटिया व सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा या प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. या कामगार अधिकाऱ्यांचा पगार थेट बँकेत जमा करण्याचे आदेश कंत्राटदारांना दिले जाण्याची शक्यता आहे, तर अधिकाऱ्यांना कायम अभियंत्यापेक्षा दहा टक्के पगार कमी देऊन सर्व सुविधा दिल्या जाण्याचा तोडगा काढला जाणार आहे.

सिडकोचे मुख्यालय बेलापूरमध्ये आहे. प्रकल्पग्रस्तांनी या मुख्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे, मात्र या प्रकल्पग्रस्तांना सामोरे जाण्याऐवजी सिडको त्यांच्या नेत्यांना मुंबईत निर्मल भवन येथे चर्चेसाठी बोलवत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संताप आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे.