चालू शैक्षणिक वर्षांत नवीन रूपडे धारण केलेल्या बारडवाडीच्या जि. प. प्राथमिक शाळेच्या विद्याथ्यार्ंनी दीपावलीचा सण उत्साहात साजरा केला. आकर्षक रोषणाई, वातीचे दिवे यांनी शाळेची इमारत उजळून निघाली. अधिकारी, शिक्षकांसह गावकऱ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग यामुळे विद्यार्थ्यांंच्या आनंदाला भरते आले.
मुदखेड तालुक्यातील बारड शिक्षण विभागात बारडवाडीच्या प्राथमिक शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक संतोष तिम्मापुरे व सहकारी रामदास वडमिले यांनी शाळेचे रूप पालटण्याचा संकल्प सोडला. निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त आनंदात अध्ययनाचा आनंद शाळेतील विद्यार्थी घेत आहेत. दीपावलीच्या सण घराघरात साजरा केला जातो, तसा व्यवसायाच्या ठिकाणीही तो घेतला जातो. याच विचारातून तिम्मापुरे यांनी शाळेत दिवाळी साजरी करण्याची कल्पना मांडली. चौधरी यांनी त्याप्रमाणे आयोजनाबाबत सूचना केल्या. त्याची अंमलबजावणी शाळेत करण्यात आली.
सरपंच शिवकला मुलंगे, उपसरपंच गोपाळ देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप देशमुख, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा लता देशमुख, उपाध्यक्ष कांजाळे, गणेशराव शिप्परकार, कैलास देशमुख आदींनी सहभाग नोंदविला. दिव्यांनी उजळलेल्या प्रकाशात मुलांनी फटाके, फुलझाडे, उंच आकाशातील आतषबाजी करून दिवाळी साजरी केली. ग्रामस्थांनी उपस्थितांना मिठाई व फराळाचे वाटप केले.
शिक्षण विस्तार अधिकारी चौधरी, साहित्यिक दीपक महािलगे, अरुण अतनुरे, समर्थ एकाळे, तुकाराम सूर्यवंशी, रामकृष्ण लोखंडे, मनोज पांचाळ यांनीही हजेरी लावली. या उपक्रमाबाद्ल शिक्षणाधिकारी एकनाथ मडावी, उपशिक्षणाधिकारी अशोक देवकरे, गटशिक्षणाधिकारी अच्युत आजेगावकर यांनी शिक्षक व केंद्रप्रमुख अंजली तेलंग यांचे अभिनंदन केले.