बागलाण तालुक्यातील तळवाडेभामेरच्या जलसिंचन प्रकल्पापर्यंतच्या पोहोच कालव्यासाठी या आर्थिक वर्षांत साडेचार कोटी रुपयांचा निधी मिळू शकेल, अशी माहिती तापी खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक प्र. रा. भामरे यांनी  बैठकीत दिली.
महामंडळाच्या उध्र्व गोदावरी पाटबंधारे विभागातील हरणबारी धरणाच्या कढगड बंधारा ते तळवाडे भामेपर्यंतच्या पोहोच कालव्याचे काम २००१पासून सुरू असून  अद्याप अपूर्णच आहे. कालव्याचे २१ ते २८ किलोमीटर दरम्यानचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. बैठकीस खा. प्रताप सोनवणे, नाशिक जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस वसंत निकम, जि. प. सदस्य सुनीता पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. भूसंपादन प्रक्रिया, निधीची उपलब्धता, कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा, यासंदर्भात त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनी कालव्याच्या कामासाठी शेतजमीन देण्यास संमती दिल्यास लवकरच काम सुरू केले जाईल. या कामासाठी साडेचार कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे.  अधिक अडीच कोटी मिळावेत म्हणून प्रयत्न करण्याचे आश्वासन भामरे यांनी दिले. बैठकीस डॉ. सी. एन. पाटील, रतन वाघ, बी. एन. ठाकरे उपस्थित होते. जलसंपदाच्या बैठकीस मुख्य सचिव मालिनी शंकरन् उपस्थित होत्या.