राज्यातील पोलीस उपनिरीक्षक तसेच त्यावरील अधिकाऱ्यांना यंदा मोठय़ा प्रमाणात पदोन्नती देण्याचा गृह खात्याचा प्रयत्न असून इच्छुक स्थळी बदली करवून घेण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावणे सुरू झाले आहे. अधिकाऱ्यांची सर्वाधिक पदे रिक्त असलेल्या नागपूर आयुक्तालयात किती जण रुजू होतात, हे महिन्याभरात स्पष्ट होणार आहे.  
साधारणपणे एप्रिल महिन्याच्या अखेरीस राज्य पोलीस दलात वार्षिक सर्वसाधारण बदल्या केल्या जातात. त्यात काहींना पदोन्नती दिली जाते. त्यासाठी साधारण महिनाभरापूर्वी तयारी सुरू होते. यंदा ही तयारी बऱ्याच आधीपासून म्हणजे गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच सुरू झाली आहे. उपनिरीक्षक व त्यावरील अधिकाऱ्यांना मोठय़ा प्रमाणात पदोन्नती देण्याचा गृह खात्याचा प्रयत्न असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ७१० पोलीस उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षकपदी पदोन्नती देण्यासाठी यादी तसेच त्यांची सेवाविषयक माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाने मागवून घेतली आहे. सहायक निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदी मोठय़ा प्रमाणात पदोन्नती दिली जाणार असून त्यासाठी यादी तयार करून त्यांची सेवाविषयक माहिती मागवून घेण्यात आली आहे. कुठे, कुठल्या शाखेत, कोणत्या पदावर, किती दिवस काम केले, विविध ठिकाणी व विविध पदांवर नियुक्तयांची तारीख, शिक्षा (असल्यास), जात प्रमाणपत्र आदींचा त्यात समावेश आहे. पोलीस निरीक्षक ते सहायक पोलीस आयुक्त व त्यावरील अधिकाऱ्यांनाही पदोन्नती दिली जाणार आहे.
मोठय़ा प्रमाणात पदोन्नती दिली जाणार असल्याने पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून त्यात आपली वर्णी लागते काय, याची अनेकांना चातकासारखी प्रतिक्षा आहे. इच्छुक ठिकाणी बदली व्हावी, असेही अनेकांना वाटते. कुणी सुटी काढून तर कुणी काम काढून मुंबईत जाऊन ‘फिल्िंडग’ लावणे सुरू केले आहे. साधारण तीन वर्षे  हा बदलीसाठी पहिला निकष आहे. (नक्षलवाद क्षेत्रात अडीच वर्षे) विनंतीनुसारही बदल्या केल्या जातात. बदलीसाठी ‘चॉईस’ विचारला जातो. त्यासाठी एक किंवा तीन-चार ठिकाणे सुचवावी लागतात. इच्छुक ठिकाणी फारच कमी जणांच्या वाटय़ाला येते, असा अनेकांचा अनुभव आहे. एका जागेवर अनेकांनी इच्छा व्यक्त केली असली तरी कुण्या एकाचीच नियुक्ती करावी लागते, हे वास्तव आहे.  मोठय़ा प्रमाणात पदोन्नती दिल्याने रिक्त पदेही मोठय़ा प्रमाणात भरली जातील, असे अनेकांना वाटते. नागपुरात दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त, पंधरा सहायक पोलीस आयुक्तांसह मोठय़ा प्रमाणात अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. पदे रिक्त असणे ही स्थिती कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण राज्यात असली तरी सर्वाधिक रिक्त पदांची संख्या नागपुरात असल्याचे सांगितले जाते. विदर्भ हा राज्याचाच भाग आहे. तरीही विदर्भात येण्याची काहींची अपवाद सोडल्यास अनेकांची इच्छा नसते.  विदर्भात बदली झाल्यास वशिला लावून ती रद्द करवून घेतली जाते. त्यामुळे येथील अनेक पदे रिक्त राहतात. त्यामुळे सर्वाधिक पदे रिक्त असलेल्या नागपूर आयुक्तालयात कितीजण रुजू होतात, हे महिन्याभरात स्पष्ट होणार आहे.