साखर कारखाने व शेतक-यांनी संघर्ष करीत न राहता कारखाने सुरू ठेवून ऊस दराचा लढा करू या,असे म्हणत वारणा साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार विनय कोरे यांनी सोमवारी वारणेचा गळीत हंगाम सुरू करण्याचे संकेत दिले. तर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी जिल्हाधिकारी माने व साखर सहसंचालक वाय.व्ही.सुर्वे यांच्याशी झालेल्या बैठकीवेळी वारणा कारखान्याने पहिली उचल जाहीर न करता कारखाना सुरू केल्यास कायदा हातात घेऊन मोडतोड करावी लागेल, असा इशारा दिला आहे. या घडामोडी पाहता कोल्हापूर जिल्ह्य़ात वारणा हा कारखाना सर्वप्रथम सुरू होणार असल्याचे संकेत असले तरी त्यामध्ये शेतक-यांची आडकाठी येऊन संघर्ष होणार असल्याचेही दिसू लागले आहे.    
वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागाच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम सोमवारी आयोजित केला होता. या निमित्ताने कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. मेळाव्यात संचालक सुभाष पाटील, वसंत गुरव, विश्वनाथ पाटील, उदय पाटील, संभाजीराव पाटील, आनंदराव पाटील, संभाजी सुबराव पाटील आदींनी आपल्या मनोगतात वारणाने ऊस गळीत हंगामास विलंब होत असल्याने शेतक-यांचे आर्थिक नुकसान होऊ लागल्याने कारखाना सुरू करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर आमदार कोरे यांनी साखर उद्योगाची वस्तुनिष्ठ परिस्थिती सादर करून वारणेचा ५५ वा गळीत हंगाम शुभारंभ गुरूवारी सुरू करण्याचे संकेत दिले. आपल्या प्रतिष्ठेसाठी नव्हे, तर शेतक-यांच्या हितासाठी गळीत हंगाम सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, कोल्हापूर, सांगली वगळता अन्य जिल्ह्य़ांमध्ये खासगी कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे ऊस दरासाठीचा लढा राज्यव्यापी स्वरूपाचा राहिलेला नाही. ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांच्या प्रश्नासाठी आपण शासनाकडे एकत्र लढू या. हवेतर खास रेल्वेने शेतक-यांना नवी दिल्लीला नेण्याची सोय केली जाईल. शेतक-यांच्या लढय़ात खांद्याला खांदा देऊन उतरण्याची तयारीही त्यांनी दर्शविली.    
दरम्यान, सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी माने व साखर संचालक वाय.व्ही.सुर्वे यांच्याशी वारणा साखर कारखान्याच्या गळीत हंगामासंदर्भात चर्चा केली. वारणा साखर कारखाना सुरू करण्याचा प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. बैठकीवेळी काटे म्हणाले,की स्वाभिमानीने कराड येथे आंदोलन केले असता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुदत मागवून घेतली होती. खासदार राजू शेट्टी यांनी २४ तारखेपयर्ंतची मुदत दिलेली आहे. ऊस दराचा प्रश्न मुख्यमंत्री व शेट्टी यांच्या कोर्टात आहे. तरीही उसाची पहिली उचल जाहीर न करताच वारणा कारखान्याने हंगाम सुरू करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. वारणाने गेल्या हंगामातील अंतिम दर अद्याप दिलेला नाही. त्यामुळे या कारखान्याचा गाळप परवाना रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी स्वाभिमानीचे रमेश भोजकर, बी.जी.पाटील, शिवाजी माने, संतोष जाधव, अमर कांबळे आदी उपस्थित होते.