गृहनिर्माण क्षेत्रात अवतरलेल्या तथाकथित मंदीची झुळूक ठाण्यापर्यंत पोहोचेल आणि येथील घरांचे दर धाडकन खाली कोसळतील, अशा स्वप्नरंजनात राहणाऱ्या ग्राहकांचा शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या मालमत्ता प्रदर्शनातील घरांचे चढे दर पाहून पुरता भ्रमनिरास होत आहे. लोढा, रुस्तमजी, हिरानंदानी, दोस्ती, कल्पतरू यांसारख्या बडय़ा विकासकांच्या गृहप्रकल्पांमधील घरांच्या दरांचा आलेख गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही चढाच आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारने ठाण्यात मेट्रो सुरू करण्याची घोषणा नुकतीच केल्याने बिल्डरांचे आयतेच फावले असून मेट्रोच्या नियोजित मार्गालगत उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांमधील घरांच्या दरात प्रतिचौरस फुटास ३०० ते ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती नगरनियोजन क्षेत्रातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
ठाणे, भिवंडीतील बडय़ा विकासकांनी एकत्र येऊन भरविलेले मालमत्ता प्रदर्शन बाळकूम येथील हायलॅण्ड पार्क येथे शक्रवारपासून सुरू झाले. सुमारे ६० पेक्षा अधिक विकासक, कर्ज पुरवठा करणाऱ्या बडय़ा वित्तीय संस्था आणि ५०० पेक्षा अधिक मोठे गृहप्रकल्प असा मोठा थाटमाट या प्रदर्शनाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे. असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत या घरांच्या किमतीमध्ये वाढच दिसून आली आहे.
राज्य सरकारने वडाळा-घाटकोपर-ठाणे मार्गावर मेट्रो सुरू करणार असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. त्याचा पुरेपूर परिणाम या मालमत्ता प्रदर्शनात दिसून येत आहे. मुंबईतून येणारी मेट्रो तीनहात नाकामार्गे घोडबंदरच्या ओवळा भागापर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रोमार्गालगत उभ्या राहत असलेल्या मालमत्तांमधील घरांचे दर आतापासूनच ३०० ते ५०० रुपयांनी वाढविण्यात आले आहेत, अशी माहिती रियल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञ राजेश जाधव यांनी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकाही प्रकल्पात दरकपात झाल्याचे चित्र नाही. गृहनिर्माण क्षेत्राचा सध्याचा बाजार लक्षात घेता हे दर वास्तवदर्शी आहेत का, याचा अभ्यास आता बिल्डरांनीच करावा, असे मतही जाधव यांनी मांडले. दरम्यान, ठाणे शहराचा झपाटय़ाने होणारा विकास लक्षात घेता इतर शहरांच्या तुलनेत येथील रियल इस्टेट क्षेत्रात मंदी नाही, असा दावा एमसीएचआय, ठाणेचे प्रमुख सुरज परमार यांनी केला. मेट्रोची घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आश्वस्त करण्याचे काम आम्ही करत आहोत, असेही ते म्हणाले.
जयेश सामंत, ठाणे

घरांचे दर (रुपये/चौ. फूट)
* तीन हात नाका परिसर १३ ते १५ हजार
* घोडबंदर, बाळकूम, माजिवडा, लोकपुरम : १० ते १२ हजार
* सुरज पार्क ९ हजार ते ९५००

स्वस्त घरांसाठी शीळ, भिवंडी
घोडबंदर, बाळकूम, माजिवडे, वसंत विहार यांसारख्या भागांत नव्याने उभ्या राहणाऱ्या गृहप्रकल्पांतील घरांचे दर प्रतिचौरस फूट दहा हजार रुपयांपेक्षा जास्त आहेत. घोडबंदर भागातील सुरज पार्क परिसराच्या अलीकडे उभ्या राहणाऱ्या बहुतांश गृहप्रकल्पांमधील घरांचे दर प्रतिचौरस फुटाला ११००० ते १२००० रुपयांच्या घरात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच मार्गावर काही बडय़ा बिल्डरांनी उभ्या केलेल्या ‘विशेष नागरी वसाहतीं’मधील घरांचे दर ९००० ते ९५०० हजार रुपयांच्या घरात आहेत. त्यामुळे स्वस्त आणि किफायतशीर घरांच्या शोधात असेल तर ग्राहकांपुढे शीळ, भिवंडीशिवाय सध्या तरी दुसरा पर्याय नाही, अशी माहिती ठाणे महापालिकेतील शहर विकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.