घराच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांना घर घेणे अत्यंत कठीण झाले आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील दक्षिण मुंबई, पश्चिम मुंबई, मध्य उपनगर-ठाणे, कल्याण, नवी मुंबई या उपनगरामध्येदेखील सर्वसामान्यांची हीच परिस्थिती आहे. सगळीकडे अशी परिस्थिती असली तरी बदलापूर आणि अंबरनाथ या जुळ्या शहरांमध्ये सर्वसामान्य माणसांना आर्थिकदृष्टय़ा परवडणाऱ्या घरांचा पर्याय इथे उपलब्ध आहे. अशाच घरांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी अंबरनाथमध्ये पॅनमार्क प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आ. किसन कथोरे, आ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते शुक्रवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. शनिवार आणि रविवारी हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले आहे. जीबीके लॉन्स्, पाइपलाइन जंक्शन, अंबरनाथ-बदलापूर रस्ता, चिखलोली अंबरनाथ (पूर्व)येथे भरलेल्या प्रदर्शनात परिसरातील ३० बांधकाम विकासकांच्या ७५ पेक्षा अधिक प्रकल्पांचे पर्याय एकाच छताखाली पाहता येणार आहेत. अंबरनाथ-बदलापूर या शहरांची स्मार्ट सिटी अशी ओळख आहे. रस्ते, पाणीपुरवठा आदी पायाभूत सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबई महानगर परिसरात सध्या अंबरनाथ-बदलापूरमध्ये घर घेणे सर्वात स्वस्त आणि सोईचे आहे, असे मत आ. किसन कथोरे यांनी उद्घाटन सोहळ्यात व्यक्त केले. बदलापूर-अंबरनाथ योजनाबद्ध ठिकाणी व मध्यवर्ती असल्याने मुंबई-नाशिक-पुणे यांचा सुवर्णमध्य जुळला आहे. अंबरनाथ ही महाराष्ट्रातील एक मोठी औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे येथील गृहप्रकल्पातील गुंतवणूक भविष्यात किफायतशीर ठरेल, असा विश्वास आ. बालाजी किणीकर यांनी व्यक्त केला. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांपासून प्रदर्शनस्थळी जाण्यासाठी मोफत वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.