जागतिक आर्थिक मंदीचे सावट दिवसेंदिवस अधिक गडद होत असून त्याचा सार्वाधिक फटका सध्या रियल इस्टेटला बसत आहे. मंदी आणि महागाईमुळे ग्राहकांनी रियल इस्टेटकडे पाठ फिरवलेली असून नवी मुंबई, पनवेल, उरण भागातील घर विक्री जवळ जवळ ठप्प झाली आहे. विविध सवलती, योजना जाहीर करूनही ग्राहक गळाला लागत नसल्याचे चित्र असताना ग्राहकांना आर्कषित करणारे दोन मालमत्ता प्रदर्शन येत्या दोन महिन्यांत आयोजित करण्यात आले आहेत. त्यातील एमसीएचआयचे प्रदर्शन उद्यापासून पामबीच मार्गवर सुरू होत आहे. त्यामुळे आर्थिक मंदीच्या या निखाऱ्यांवर मालमत्ता प्रदर्शनांनी फुंकर घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जागतिक आर्थिक मंदीची झळ हळूहळू जाणवू लागली आहे. त्याचा मोठा फटका रियल इस्टेटला बसू लागला असून काही महिन्यांपूर्वी बँकांमध्ये होणाऱ्या कर्जाचा आलेख झपाटय़ाने खाली घसरला आहे. त्यामुळे अनेक बँका कर्ज घेण्यासाठी ग्राहकांची मीनतवारी करीत असल्याचे दृश्य आहे. बिल्डरांनी एक लाखापेक्षा जास्त सूट देऊन अनेक बक्षिसे जाहीर केलेली आहेत. तरीही ग्राहकांनी पाठ फिरवलेली आहे. मुंबई पुण्यात जास्तीत जास्त घरे बांधण्यास प्राधान्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या विकासकांच्या बैठकीत जाहीर केले. पण झपाटय़ाने नागरीकरण होणाऱ्या नवी मुंबईकडे मात्र शासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. पनवेल, उरण, पेण, खोपोलीपर्यंतचा भाग नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र (नयना) जाहीर करण्यात आल्याने या भागातील अधिकृत विकास सध्या ठप्प झाला आहे. सिडको या क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्यात गुतंली आहे. त्यामुळे गृहसंकुल बांधण्यासाठी परवानगी घ्यायची कोणाकडे, असा प्रश्न विकासकांना पडला आहे. हा आदेश जाहीर होण्यापूर्वी ज्यांनी काम सुरू केले होते ती कामे सध्या प्रगतिपथावर आहेत, पण त्यांना उठाव नाही. सिडकोने गेले आठ माहिने साडेबारा टक्के योजनेतील भूखंडांना फुल्ली मारली आहे. नयना प्रकल्पातील गृहप्रकल्पांना मंजुरी देणारी यंत्रणा नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. मागणी आणि पुरवठय़ामध्ये कमालीची तफावत निर्माण झालेली आहे. बॅकांच्या जाचक अटींमुळे ‘घर नको पण कर्ज आवर’ असे म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. अशा सर्व पाश्र्वभूमीवर नवी मुंबईत चक्क दोन मालमत्ता प्रदर्शने उद्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत होणार आहेत. यात १४० बिल्डर आपल्या मालमत्तांचे प्रदर्शन करणार आहेत. त्या एक हजापर्यंतची घरे व गाळे असणार आहेत. सीवूड रेल्वे स्थानकासमोरील मैदानात होणाऱ्या या प्रदर्शनात बारा लाखांपर्यंतची घरे उपलब्ध असणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. अशाच प्रकारचे दुसरे एक प्रदर्शन नवी मुंबई बिल्डर असोशिएशनच्या वतीने डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात सानपाडा येथे होणार असून त्यासाठी ग्लोबल कोकणचा आधार घेण्यात आला आहे. कोकण ग्लोबलचे होणारे तिसरे प्रदर्शन यंदा नवी मुंबईत होणार असून त्यासाठी येणारे ग्राहक मालमत्ता प्रदर्शनाला भेटी देतील असे आराखडे बांधण्यात आले आहेत. ग्लोबल कोकणसाठी येणाऱ्या ग्राहकांमध्ये बघ्यांची संख्या जास्त असल्याने ते मालमत्ता प्रदर्शनाकडे वळणार आहे. त्यामुळे मालमत्ता घेणारे किती, हा प्रश्न कायम अनुत्तरित राहणार आहे. घरे विकण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे मत अश्विन रूपारेल यांनी मांडले. त्यामुळे घरविक्री होत नसल्याची अगतिक त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत होती. नवी मुंबईत मंदी नसून ग्राहकांना मागणी तसा पुरवठा होत असल्याचे प्रकाश बावीस्कर यांनी सांगितले. अनेक सवलती योजना जाहीर करूनही सध्या ग्राहक घर घेण्यास धजावत नसल्याचे चित्र असताना मालमत्ता प्रदर्शनाची ही फुकंर ग्राहकांना किती दिलासा देणार हे येणारा काळ ठरवणार आहे.