कोल्हापूर जिल्ह्यात लेक वाचवा या उपक्रमाच्या नियोजनबद्ध व काटेकार अंमलबजावणीमुळे जिल्हयात सन २००१ साली ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांमध्ये दर एक हजार मुलांमागे असणारे ८३९ मुलींचे प्रमाण वाढून ते डिसेंबर २०१२अखेर ८९० वर गेल्याची माहिती पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. यावेळी त्यांनी पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांवर प्रशासनाची जरब बसेल अशी कडक कारवाई करण्याच्या सूचना आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनास दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात सेव्ह द बेबी गर्ल बाबतची बठक पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. बठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मंडलिक, जिल्हाधिकारी राजाराम माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक एस.एस. पाटील उपस्थित होते.
दर हजारी मुलांमागे मुलींचे घटते प्रमाण व त्यामुळे ढासळणारे सामाजिक संतुलन हा सामाजिक चिंतेचा व चिंतनाचा विषय असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, गर्भिलग चिकित्सा व स्त्रीभ्रूण हत्या या प्रकरणांध्ये संबंधित आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन यांनी संवेदनशीलपणे काम करणे गरजेचे आहे. यासाठी प्रसंगी कठोर कारवाई करावी लागल्यास ती करण्यात यावी. जिल्ह्यातील करवीर, हातकणंगले, पन्हाळा, शिरोळ, राधानगरी या तालुक्यात अद्यापि मुलींचे प्रमाण ९०० पेक्षा कमी असल्याने या तालुक्यात जनजागृती करण्याबरोबरच पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावण करणे आवश्यक आहे.
पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणी व जनजागृतीसाठी जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात प्रसिद्धी मोहीम राबविणे गरजेचे आहे. ही मोहीम आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. प्रसिद्धी मोहिमेसाठी आवश्यक निधीची तरतूद नाविण्यपूर्ण योजनेतून करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.