11 July 2020

News Flash

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात ठाकरे स्मारकाचा प्रस्ताव

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत दाखल झाला असून हे स्मारक विजापूर रस्त्यावर रेवणसिध्देश्वर मंदिराजवळ उभारण्याचे नियोजन आहे.

| February 27, 2014 04:00 am

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत दाखल झाला असून हे स्मारक विजापूर रस्त्यावर रेवणसिध्देश्वर मंदिराजवळ उभारण्याचे नियोजन आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे यांच्या स्मारक उभारणीचा सर्वपक्षीय प्रस्ताव आणला जात असल्याने राजकीयदृष्टय़ा हा चर्चेचा विषय ठरला आहे. विशेषत: सोलापूर लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांच्या नियोजित स्मारकाच्या रूपाने शिवसैनिकांना ‘आपलेसे’ करण्याचा सत्ताधारी काँग्रेस आघाडीचा डाव असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले तेव्हाच सोलापूर महापालिकेने त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय जाहीर केला होता. महापौर अलका राठोड व सभागृह नेते महेश कोठे यांनी स्वत: याबाबतची घोषणा केली होती. परंतु या घोषणेचा विसर पडला की काय, प्रत्यक्षात ठाकरे यांचे स्मारक उभारण्याच्या दृष्टीने कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या. हे स्मारक उभारण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही प्रयत्न चालविले नव्हते. त्यामुळे हा विषय जवळपास बाजूला पडला असतानाच आता अचानकपणे महापालिकेत सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पुढाकाराने ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव पुन्हा आणला गेला आहे. काँग्रेसचे सभागृहनेते महेश कोठे व विरोधी पक्षनेते कृष्णाहरी दुस्सा (भाजप) यांच्यासह  राष्ट्रवादीचे गटनेते दिलीप कोल्हे, भाजपचे जगदीश पाटील, शिवसेनेचे गटनेते भीमाशंकर म्हेत्रे, लक्ष्मण जाधव, मनोज शेजवाल, शैलेंद्र आमणगी, बसपाचे आनंद चंदनशिवे, माकपचे माशप्पा विटे यांनी हा प्रस्ताव तयार करून सभागृहाकडे पाठविला आहे. येत्या २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पालिका सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव झटपट एकमताने मंजूर होण्याची अपेक्षा आहे.
हिंदुह्दयसम्राट, शिवसैनिकांचे पंचप्राण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब  ठाकरे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. कला, क्रीडा, संगीत, साहित्य, समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रांशी त्यांचे अतूट नाते होते. आपल्या कुंचल्यांनी भल्याभल्यांची भंबेरी उडविणारे, आपल्या दमदार नेतृत्वाने कणखर व प्रखर भूमिकेने गेली चार दशके मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करून मराठी अस्मितेची जपणूक करण्याची भूमिका बाळासाहेबांनी शेवटपर्यंत पार पाडली. मराठी माणसाचा विकास, महाराष्ट्राचा सर्वागीण विकास करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि मराठी मनाचा आवाज बुलंद केला. अशा प्रेरणादायी नेतृत्वाचे स्मरण कायमस्वरूपी राहावे म्हणून शहरात मुंबईतील शिवसेना भवनाच्या धर्तीवर भव्य स्मारक असावे, असे प्रस्तावात म्हटले आहे. वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका, अ‍ॅम्फी थिएटर, कलादालन अशा विविध घटकांनी युक्त असे भव्य स्मारक विजापूर रस्त्यावरील रेवणसिध्देश्वर मंदिराजवळ रेल्वे उड्डाणपूल, सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग व सय्यद बुखारी दर्गाह परिसरातील आरक्षित १.७० हेक्टर क्षेत्रापैकी ४५०० चौरस मीटर भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यास मान्यता देण्याचे प्रस्तावात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2014 4:00 am

Web Title: proposal of thackeray memorial in the face of lok sabha elections in solapur
Next Stories
1 सांगली महापालिकेचा अर्थसंकल्प करवाढविना
2 लोणंद बाजारातून गरवा कांद्याची निर्यात
3 प्रकृती बिघडल्याने आंदोलक रुग्णालयात
Just Now!
X