जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. डी. राजपूत यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ मंगळवारी पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना, महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना यांच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. डॉ. राजपूत यांच्या वित्तीय अधिकारांप्रमाणे प्रशासकीय अधिकार काढण्यात यावे, त्यांची बदली करण्यात यावी, तसेच त्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
डॉ. राजपूत हे त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना तुच्छतेची वागणूक देतात, कामासाठी त्यांच्या कक्षात बोलावून तुझी विभागीय चौकशी लावेन अशी धमकी देतात, काहींची अडवणूक करत पैशांची मागणी करतात, तुला कायमच बिनपगारी करेन अशा धमक्या देत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करत असल्याची तक्रार संघटनांनी केली आहे. या पाश्र्वभूमीवर, एप्रिल महिन्यात संघटनांनी काम बंदचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यांचे वित्तीय अधिकार काढून घेण्यात आले. या कारवाईचा डॉ. राजपूत यांच्यावर कुठलाही परिणाम झाला नसून, उलटपक्षी त्यांचा विक्षिप्तपणा वाढला असल्याचे डॉ. महेश ठाकूर यांनी सांगितले. आपल्या प्रशासकीय अधिकारांचा गैरवापर करत त्यांच्या मनमानी कारभारात वाढ झाली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दडपशाही धोरणाचा अवलंब केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. डॉ. राजपूत यांच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी शेकडो अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.
डॉ. राजपूत यांचे प्रशासकीय अधिकार काढण्यात यावेत, त्यांची तातडीने बदली करावी, त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची विभागीय चौकशी व्हावी आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. आंदोलकांची आ. माणिक कोकाटे, आ. धनराज महाले आणि आ. अनिल कदम यांनी भेट घेऊन चर्चा केली. जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांनी डॉ. राजपूत यांची फाईल तातडीने वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, कारवाईसाठी पाठपुरावा केला जाईल
असे आश्वासन दिले. या संदर्भात बुधवारी पवार यांच्या दालनात पशुसंवर्धन विभाग पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आल्याचे डॉ. ठाकूर यांनी सांगितले.