कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या वतीने मंगळवारी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. महापौर प्रतिभा नाईकनवरे यांना निवेदन देण्यात आले. महापालिका कृती समितीच्या बरोबर असल्याची ग्वाही त्यांनी दिली. उद्या बुधवारी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कसबा बावडा येथील निवासस्थानावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.    
कोल्हापूर शहरात आयआरबी कंपनी १७ ऑक्टोबरपासून टोलवसुलीस सुरुवात करणार आहे. या टोलआकारणीस कोल्हापूरकरांचा विरोध आहे. टोलला हद्दपार करण्यासाठी कृती समितीच्या वतीने आंदोलन छेडले जात आहे. याअंतर्गत मंगळवारी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. आयआरबी कंपनीने टोलवसुली थांबवावी असा ठराव करण्याची मागणी कृती समितीच्या वतीने महापौरांकडे करण्यात आली. महापौर प्रतिभा नाईकनवरे यांना टोलविरोधी कृती समितीच्या वतीने प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी निवेदन दिले. या वेळी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, नगरसेवक आर. डी. पाटील, राजेश लाटकर आदी नगरसेवक उपस्थित होते. त्यांनी हा विषय आजच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित करण्याचे मान्य केले.    
या वेळी टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे, प्रा. एन. डी. पाटील, अॅड. गोविंदराव पानसरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, संपतराव पाटील, रामभाऊ चव्हाण, दिलीप देसाई, बाबा पार्टे, बाबा इंदुलकर आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.