शहरातील मध्यवर्ती भागात सुभाष रस्त्यालगत अनेक वर्षांपासून अर्धवट बांधकाम असलेल्या नियोजित सावित्रीबाई फुले भाजी बाजारचे काम त्वरीत पूर्ण करावे, या मागणीसाठी सावित्रीबाई फुले भाजी बाजार व्यापारी संघटनेच्या नेतृत्वाखाली भाजी मंडईच्या इमारतीत विक्रेत्यांनी आंदोलन केले. लवकरच भाजी बाजार बंद करून आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
भाजी बाजाराचे काम पूर्ण झालेच पाहिजे, विक्रेत्यांना ओटे मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत विक्रेत्यांनी भाजी बाजारचा परिसर दणाणून सोडला. संघटनेचे अध्यक्ष गंगाभाऊ त्रिभूवन यांच्या नेतृत्वाखाली विक्रेते आंदोलनात सहभागी झाले. नियोजित भाजी बाजार इमारतीचा प्रश्न अनेक वर्षांपासून धूळखात पडला आहे. भाजी बाजारासाठी नवीन इमारत बांधण्याचे काम पालिकेने हाती घेतले. परंतु थोडेसे बांधकाम झाल्यानंतर ते बंद पडले. अद्याप काम सुरू झालेले नाही. सध्या या इमारतीला कचरा कुंडीची अवस्था प्राप्त झाली आहे. भाजी बाजारचे काम पूर्ण न झाल्याने विक्रेत्यांची गैरसोय होत आहे. त्यांना भाजी विकण्यासाठी रस्त्याच्या कडेला दुकाने थाटावी लागतात. त्यामुळे भाजी बाजार विभागला गेला. याबाबत वेळोवेळी आंदोलन करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप व्यापारी संघटनेने केला. भाजी बाजार इमारतीचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, सध्या या इमारतीत तयार झालेले ओटे भाजी विक्रेत्यांना मोफत देण्यात यावे यासाठी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.