एमजीएम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील ३ हजार ७०० विद्यार्थ्यांनी सोमवारी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला. गुरुवारी दीपाली दुबे या विद्यार्थिनीच्या डोक्यात पंखा पडल्याच्या घटनेनंतर महाविद्यालयातील पंख्यांचे गज चार दिवसांमध्ये बदलण्याचे काम करून घेतो, असे आश्वासन विद्यार्थ्यांना एमजीएम महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने दिले होते. मात्र महाविद्यालय मागण्यांबाबत गंभीर नसल्याने विद्यार्थ्यांनी  प्रवेशद्वारासमोर बसून निषेध केला
‘आम्ही भावी अभियंते आहोत. आम्हाला आमच्या शिक्षणाचे महत्त्व माहीत आहे, मात्र गेल्या वर्षभरापासून आम्ही आमच्या मागण्या मांडतोय. मात्र प्राचार्य आणि व्यवस्थापन या मागण्यांकडे दुर्लक्ष का करताहेत? किमान यापुढे नवीन दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांवर हीच वेळ येऊ नये, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.  माजी आरोग्यमंत्री कमलकिशोर कदम हे महात्मा गांधी मिशन (एमजीएम) महाविद्यालयाच्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. एमजीएम महाविद्यालयात वर्ग सुरू असताना तीन वेळा विद्यार्थ्यांच्या अंगावर पंखा कोसळल्याने विद्यार्थी जखमी झाले. वेळोवेळी एमजीएमच्या व्यवस्थापनाकडून दुरुस्ती करू, पिण्याची पाण्याची सोय करू, ग्रंथालय, प्रयोगशाळा अद्ययावत करू अशा अनेक आश्वासनांची खैरात होते. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी काहीच नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोमवारी विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी आलेल्या एमजीएमचे टस्ट्री कमलकिशोर कदम यांच्यासमोर प्राचार्य हटावचा नारा दिला. एनएसआययूचे मयरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सोमवारी सुरू होते. याबाबत कदम म्हणाले की, इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. येत्या पंधरा दिवसांत सर्व काम झाल्याचे चित्र पाहायला मिळेल. निवडणुका जवळ आल्याने विद्यार्थ्यांच्या संघटनेतील राजकीय प्रवृत्तींनी आंदोलनाचा देखावा केला असल्याचा दावाही त्यांनी केला. शिक्षणात राजकारण आणू नये असेही ते म्हणाले.