नवनीतनगरातील बस थांब्याजवळ सोमवारी सकाळी झालेल्या खूनप्रकरणी वाडी पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपींच्या अटकेसाठी अमरावती मार्गावर टायर्स जाळून ‘रस्ता रोको’ केल्याप्रकरणी जमवातील सुमारे ५० जणांविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दखल केला.
महादेव उर्फ माधव नारायण साळवे (रा. पालकरनगर) याचा सोमवारी सकाळी अनोळखी आरोपींनी दगडाने डोके ठेचून खून केला. या घटनेने त्या परिसरात खळबळ उडाली. दुपारी चार वाजताच्या सुमारास संतप्त जमावाने अमरावती मार्गावर अचानक रास्ता रोको केला आणि वाहतूक रोखून धरली. आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना ताब्यात देण्याची त्यांची मागणी होती. त्यामुळे वाडी पोलिसांची धावपळ उडाली. जमावाने रस्त्यावर ठाण मांडल्याने महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक खोळंबली. दूरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. विनापरवानगी रास्ता रोको व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी जमावातल पन्नास महिला-पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दरम्यान, महादेवच्या खूनप्रकरणी संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. रविवारी रात्री महादेव हा त्याच्या मित्राच्या सासरी लग्नास गेला होता. तेथून परत जात असताना मोटारसायकलवर ५-६ आरोपी आले. त्यांनी तोंडावर रुमाल गुंडाळले होते. त्यांनी महादेवला मारहाण केल्याने त्याचा मित्र मध्ये पडला. आरोपींनी त्यास धमकावून हाकलून लावले. त्यानंतर सोमवारी सकाळी त्याचा खून झाला.
महादेवच्या कुटुंबीयांनी त्याच परिसरात राहणाऱ्या दोघांवर संशय व्यक्त केला.
काही महिन्यांपूर्वी एका लग्नात डीजेवर नाचताना त्यांचे व महादेवचे भांडण झाले होते.
तेव्हा त्या दोघांनी महादेवला धमकी दिली होती, असे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्या दोन संशयितांचा शोध सुरू केला.