पश्चिम नागपुरातील त्रिमूर्तीनगर, प्रियदर्शिनीनगरसह काही वस्त्यांमध्ये गेल्या पाच-सहा दिवसांपासून पाण्याचा तुटवडा आहे. अल्प प्रमाणात मिळणारे पाणीही गढूळ असल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍स कार्यालयातील सामानाची तोडफोड करून संताप व्यक्त केला.
चोवीस तास पाणी देऊ असा दावा करणाऱ्या ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सतर्फे शहरातील विविध भागात उन्हाळ्यापूर्वी नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. पश्चिम नागपुरातील त्रिमूर्तीनगर, प्रियदर्शिनीनगर या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या असल्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या जलप्रदाय विभागात आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सच्या कार्यालयात तक्रार केली. या संदर्भात कुठलीच कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे संतापलेल्या परिसरातील नागरिकांनी आज ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सच्या कार्यालयावर मोर्चा आणला. अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर केवळ आश्वासने मिळाल्यामुळे संतापलेल्या काही युवक आणि महिलांनी कार्यालयात तोडफोड केली. टेबल खुच्र्याची फेकाफेक करून परिसरात ठेवण्यात आलेल्या कुंडय़ा फोडण्यात आल्या. संगणक आणि प्रिंटर्सची तोडफोड करण्यात आल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी संताप व्यक्त करून महापालिकेचा निषेध केला. प्रतापनगर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून आंदोलनकर्त्यां कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तोडफोड करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याची चर्चा परिसरात होती.
घटनास्थळी महापालिकेचे विरोघी पक्ष नेते विकास ठाकरे आले आणि त्यांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी विकास ठाकरे म्हणाले, उन्हाळ्याचे दिवस असताना नागरिकांना पाणी मिळत नाही. अनेक वस्त्यांमध्ये गढूळ पाणी येत असल्यामुळे लोक आजारी पडत आहे. संतापलेल्या नागरिकांनी ही तोडफोड केली आहे.नागरिकांनी चोवीस तास पाणी देण्याचा दावा करताना नागरिकांना गढूळ पाणी मिळत आहे. येत्या काळात पाण्याची समस्या अशीच राहिल्यास जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागणार आहे.  या संदर्भात ऑरेंस सिटी वॉटर वर्क्‍सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, पश्चिम नागपुरातील काही वस्त्यांमध्ये गढूळ पाणी येत आहे हे जरी खरे असले तरी त्या भागात सध्या नव्या पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना भरपूर आणि शुद्ध पाणी मिळावे याची काळजी घेण्यात येईल.