‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग दादागिरी, दडपशाही व सांस्कृतिक दहशतीने बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या परशुराम जयंती उत्सव समिती, हिंदू एकता आंदोलन, शुक्ल यजुर्वेदीय ब्राम्हण संस्था व पुरोहित संघ या संघटनांवर बंदी घालावी, या मागणीसाठी सोमवारी अत्याचारविरोधी कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
दोन दिवसांपूर्वी ‘शिवाजी अंडरग्राउंड..’ या नाटकाचा प्रयोग बंद पाडण्याचा अयशस्वी प्रयत्न संबंधित संघटनांनी केला होता.
विशिष्ट जाती धर्माच्या देवांना पुढे आणून, भावनिक राजकारण करून नाटय़ प्रयोग बंद पाडण्याच्या प्रयत्न करणाऱ्या संघटनांच्या निषेधार्थ या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. राहूल तुपलोंढे, अ‍ॅड. अरूण दोंदे, सोमनाथ गायकवाड आदींच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. परशुराम जयंती उत्सव समिती, हिंदू एकता आंदोलन, शुक्ल यजुर्वेदीय ब्राम्हण संस्था, पुरोहित संघ या सांस्कृतिक दहशतवाद वाढविणाऱ्या संघटनांवर बंदी आणावी, अशी मागणी आंदोलकांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारीत प्रयोग गुंडगिरीने व दडपशाहीने बंद पाडणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी, पुरोहित संघाच्या अध्यक्षांच्या परिवाराच्या मालमत्तेची चौकशी करावी, विशिष्ठ धर्माचे स्तोम माजविणाऱ्या व्यक्ती व पक्ष संघटनांवर देशद्राहाचा आरोप ठेवून गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही कृती समितीने केली आहे.