गायीच्या मांसाची वाहतूक करताना पकडलेला टेम्पो मंगळवारी सकाळी संतप्त जमावाने लासलगावलगतच्या विंचूर गावाजवळ पेटवून दिला. मांस वाहतुकीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मोर्चा काढून संशयितांवर कठोर कारवाईची मागणी केली. बेकायदेशीर मांस वाहतूकप्रकरणी पोलिसांनी औरंगाबादच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
लासलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सोमवारी रात्री वाढदिवस साजरा करून परतत असताना महामार्गावर आयशर टेम्पोतून प्रचंड दरुगधी येत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे संबंधितांनी टेम्पोची पाहणी केली असता त्यात मांस असल्याचे उघड झाले. या घटनेची माहिती स्थानिक पदाधिकारी व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी लासलगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने धाव घेऊन टेम्पो व मांस असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चालक सय्यद अनिफ जिलानी व मोहंमद हबीब हनीफ शेख (दोघे रा. औरंगाबाद) यांच्याविरुद्ध कत्तलीचा परवाना नसताना मांस वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती सर्वदूर पसरली. याच वेळी टेम्पो खाली करण्यासाठी अन्यत्र नेण्यात आला होता. संतप्त जमावाने तिकडे धाव घेऊन टेम्पो पेटवून दिला. शिवसेनेचे माजी आमदार कल्याणराव पाटील, माजी सरपंच जयदत्त होळकर, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली संतप्त लासलगावकरांनी मोर्चा काढून साहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. सानप यांना निवेदन दिले. तसेच व्यावसायिकांनी दिवसभर आपले व्यवहार बंद ठेवून संताप व्यक्त केला. आंदोलन करणाऱ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल करू नयेत, तसेच बेकायदेशीर मांस वाहतूक करणाऱ्या सूत्रधारावर कारवाई करावी, अशी मागणी राजकीय पदाधिकाऱ्यांनी केली.