बिहारमधील बौद्धगया येथे झालेल्या बॉम्बस्फोटाचे पडसाद सोमवारी परभणी जिल्हाभर उमटले. पूर्णा, जिंतूर, पालम येथे ‘बंद’ पाळण्यात आला, तर उद्या (मंगळवारी) परभणी ‘बंद’ पुकारण्यात आला आहे. पाथरीत मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीने निदर्शने करुन बौद्धगया येथील घटनेचा निषेध करण्यात आला. जिल्हा काँग्रेससह विविध सामाजिक संघटनेने या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व आंबेडकर संघटनांनी एकत्र येऊन निषेध नोंदवला. या वेळी भीमशक्तीचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, भन्ते कश्यप, मुतीतानंद, डी. एस. सहजराव, भीमराव हत्तीअंबीरे, डी. एन. दाभाडे, राणूबाई वायवळ, रवि सोनकांबळे, अतुल सरोदे, संजय सारणीकर, सिद्धार्थ भराडे, प्रल्हाद अवचार, बापुराव वाघमारे, रवि कांबळे, सुधीर साळवे, आनंद नेरलीकर, सुभाष गुजर, गणपत भिसे, शांताबाई जोगदंड, चंद्रकांत लहाने, सिद्धार्थ कसारे, सुधाकर वाघमारे, संघरत्न हातागळे आदी सहभागी झाले होते. भीमसेनेच्या वतीने शहरात निषेध फेरी काढण्यात आली. यात अमरदीप रोडे, संदीप जोंधळे, अमित काळे आदींचा सहभाग होता. युवा मंचच्या वतीने बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.
परभणी जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बॉम्बस्फोटाच्या घटनेतील आरोपीस तत्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर आनंद भरोसे, रवि पतंगे, नागेश सोनपसारे, बाळासाहेब फुलारी, बंडू पाचिलग, सिद्धार्थ जंगले, भगवान भालेराव आदींच्या सह्य़ा आहेत.
भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आनंदा भेरजे, उपाध्यक्ष व्ही. व्ही. वाघमारे, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष संपत सवने, भालचंद्र गोरे, कार्याध्यक्ष शाम साखरे, सचिव गंगाधर प्रधान, यश क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष गौतम भराडे, शिवराज पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामदास अवचार, मोईद अन्सारी, दत्तराव सुरवसे, शहाजीराजे भोसले बहुउद्देशीय प्रतिष्ठान इसादचे जिल्हाध्यक्ष विनोद भोसले, प्रा. योगेश पोले, जय जिवा मित्रमंडळाचे अध्यक्ष भालचंद्र गोरे आदींनी बोधगया घटनेचा निषेध नोंदवला.