पाकिस्तानी लष्कराच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाकिस्तानी राष्ट्रध्वज जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच इचलकरंजी येथेही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून या गोष्टीचा जोरदार निषेध करून शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने भारतमातेचे रक्षण करतांना शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी पाकिस्तानी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला, देशाच्या सीमेचे व जवानांचे रक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकार व संरक्षणमंत्र्यांचाही निषेध करण्यात आला. पाकिस्तानी सरकार हे केवळ चर्चा करून केंद्र सरकारला फसवत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी पाकिस्तानी राष्ट्रध्वज जाळण्यात आला व कार्यकर्त्यांनी त्यांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या.या वेळी भाजपाचे उपाध्यक्ष अॅड.संपतराव पवार, संतोष भिवटे, किशोर घाटगे, संदीप देसाई, श्रीकांतघुंटे, देवेंद्र जोंधले, प्रदीप पंडे, गणेश देसाई, नझीर देसाई, मधुमती पावनगडकर, भारती जोशी आदी उपस्थित होते. दरम्यान, इचलकरंजी येथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दोन भारतीय सैनिकांची क्रूर हत्या केल्याच्या निषेधार्थ कॉ.के.एल.मलाबादे चौकात आंदोलन केले.
भारतविरोधी अतिरेकी कारवाई करणाऱ्या हाफीज सईद याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनामध्ये विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री जवाहर छाबडा, सहमंत्री प्रकाश पोटे, बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक संतोष हत्तीकर, विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष शिवजी व्यास, दिलीप माणगांवकर, दत्तात्रय पाटील, सर्जेराव कुंभार, विठ्ठल जाधव, अनिल सातपुते, निलेश आमणे, अमर माने आदी सहभागी झाले होते. आंदोलकांनी प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांना निवेदन दिले. त्यामध्ये पाकिस्तानशी असलेले राजनैतिक संबंध तोडावे व पाकिस्तानला धडा शिकवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.