सांगलवाडी जवळील बायपास पुलासाठी आकारण्यात येणारा टोल रद्द व्हावा, यासाठी मंगळवारी टोलविरोधी कृती समितीने दशक्रियाविधी करुन आपला रोष व्यक्त केला.  टोलविरोधी आंदोलनाला १० दिवस झाल्याने दशक्रियाविधी करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या वेळी कार्यकर्त्यांनी टोलवसुली कृतीचा बोंब मारुन निषेध नोंदविला.
बायपास रोडवरील टोल नाक्याला विरोध करण्यासाठी वाहतूकदार संघटनेचे बापूसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टोलविरोधी कृती समिती गेले १० दिवस आंदोलन करीत आहेत.  सोमवारी आंदोलक कार्यकर्त्यांनी कंपनी कार्यालयाला टाळे ठोकल्यानंतर कर्मचार्यानी प्रमुख कार्यकर्त्यांसह २५ ते ३० जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.  त्यामुळे आज दशक्रिया विधीवेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आंदोलन स्थळी विधिवत दशक्रिया विधी करण्यात आला.  या आंदोलनात बापूसाहेब पाटील यांच्यासह उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, भाजपाच्या नीता केळकर, मनसेचे नितीन िशदे, वाहतूकदार संघटनेचे महेश पाटील, मदनभाऊ  पाटील युवामंचचे सतिश साखळकर, शिवसेनेचे बजरंग पाटील, शंकरराव चिंचकर आदींसह कार्यकत्रे उपस्थित होते.  अशोका बिल्डकॉन कंपनीच्या नावाने कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर बोंब ठोकून टोल वसुलीचा निषेध नोंदविला.