केंद्र शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापुरातील कामगार आंदोलनात उतरले होते. गुरुवारी या आंदोलनात महिला श्रमिक शक्तीचा यलगार पाहायला मिळाला. मोलकरीण कामगार, आशा वर्कर्स, अंगणवाडीसेविका यासह विविध क्षेत्रांतील सुमारे पाच हजारांवर महिला कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मुख्य मोर्चाने जात जोरदार निदर्शने केली. दरम्यान राष्ट्रीयीकृत बँकेतील कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून बँकेसमोर निदर्शने केली. सलग तीन दिवस बँकांचे व्यवहार ठप्प झाल्याने ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली.    
देशातील प्रमुख अकरा कामगार संघटनांनी केंद्र शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात दोनदिवसीय संपाचे आयोजन केले आहे. गुरुवारी या अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. टाऊन हॉल येथे जमलेल्या महिलांनी शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. तेथून महिला कामगारांचा मोर्चा निघाला. यामध्ये शासकीय कर्मचारी तसेच औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचाही समावेश होता. दसरा चौक, व्हीनस कॉर्नर मार्गे हा मोर्चा निघाला. मोर्चाचे नेतृत्व कॉ. गोविंद पानसरे, आयटकचे जिल्हाध्यक्ष एस. बी. पाटील, सर्व श्रमिक संघाचे नेते अतुल दिघे, कॉ. दिलीप पोवार, कॉ. रघुनाथ कांबळे, मोलकरीण संघटनेच्या नेत्या सुशीला यादव, आशा वर्कर्स फेडरेशनच्या आशा कुकडे, अंगणवाडीसेविका संघटनेचे कॉ. नामदेव गावडे यांनी नेतृत्व केले.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रव्यापी संपाला पाठिंबा देत हा मोर्चा निघाला. सर्वसामान्यांना वेठीला धरणारे शासनाचे धोरण घातक असल्याची घोषणा दिल्या जात होत्या. मोर्चाच्या सांगताप्रसंगी कॉ. दिलीप पोवार व सरकारी कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल लवेकर यांची भाषणे झाली. देशात प्रथमच या संपाच्या निमित्ताने कामगारवर्गीय एकजूट झाली असल्याचे सांगत त्यांनी संघटित व असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणार असल्याचे सांगितले.