बिहारमधील गया येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा औरंगाबाद शहरात विविध ठिकाणी निषेध करण्यात आला. भडकल गेटजवळ संतप्त तरुणांनी केलेल्या दगडफेकीत तीन बसचे सुमारे ८५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात केली आहे. विविध पक्ष संघटनांनी निदर्शने करून या घटनेचा निषेध नोंदविला.
गया येथील घटनेची माहिती कळाल्यानंतर बौद्ध धम्म उपासक व बौद्ध भिक्खू भडकल गेट भागात एकत्र आले. त्यांनी घडलेल्या घटनेचा निषेध केला. दरम्यान बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जळगाव जिल्ह्य़ातील एरंडोल बसस्थानकातील एमएच १४ बीटी १८७८, एमएच १४ बीटी १९४३ व शहर बसवर काही तरुणांनी दगडफेक केली. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. शांतता आणि आणि सुव्यस्था राहावी म्हणून पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.