पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी प्रस्थान करणाऱ्या संत निवृत्तीनाथ पालखीचे शुक्रवारी शहरात महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत करण्यात आले. या पालखी सोहळ्यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात तरतूद केली जाईल, असे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले.
पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या सोहळ्यास त्र्यंबक येथून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी दरवर्षी रवाना होते. गुरुवारी ही पालखी त्र्यंबकेश्वरहून विधीवत पूजन करून मार्गस्थ झाली. सातपूर येथे पहिला मुक्काम केल्यानंतर पालखी शुक्रवारी सकाळी शहरातील त्र्यंबक रस्त्यावर दाखल झाली. पालखीत श्रींच्या चांदीच्या मुखवटय़ासह पादुका ठेवण्यात आल्या असून, त्यांचे दर्शन घेण्यासाठी ठिकठिकाणी भाविकांची झुंबड उडाली. आकर्षक सजावटीसह सहभागी झालेल्या काही नवीन पालख्यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. महापालिकेतर्फे त्र्यंबक रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावालगत स्वागताची तयारी करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता दाखल झालेल्या पालखीचे महापौर यतीन वाघ यांनी स्वागत केले. श्रींच्या मुखवटय़ासह पादुकांचे त्यांनी पूजन केले. या ठिकाणी वारकऱ्यांना काही काळ विश्रांती घेता यावी, म्हणून खास मंडप उभारण्यात आला. नाश्ता व चहा-पानाची व्यवस्था करण्यात आली होती. महापौरांच्या हस्ते पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पुणे महापालिकेने आळंदी येथे भाविक व वारकरी संप्रदायासाठी बरीच विकासकामे करून दिली आहेत. हा संदर्भ घेऊन महापौरांनी पुण्याच्या धर्तीवर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी महाापलिका यंदाच्या अंदाजपत्रकात तरतूद करेल, असे सांगितले. यावेळी स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, माकपचे तानाजी जायभावे आदी उपस्थित होते. यंदा पालखी समवेत नाशिक जिल्ह्यासह मराठवाडा, नगर व इतर भागातील काही भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाले आहेत. ठिकठिकाणी मुक्काम करीत आषाढी एकादशीस पालखी पंढरपूरला पोहचणार आहे.