महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने शनिवार व रविवार या कालावधीत येथे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत रविवारी ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
महाकवी कालिदास कला मंदिर येथे हा महोत्सव होणार आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता निरंजन भालेराव (बासरी), मंजुषा पाटील (गायन), पं. सतीश व्यास (संतूर) यांची मैफल रंगणार आहे. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, प्रफुल्ल काळे, मुंदराज देव, संवादिनीवर श्रीराम हसबनीस संगीत साथ करतील. महोत्सवात रविवारी सकाळी ११ वाजता जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
यावेळी संगीत मरतड पंडित जसराज यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच महापौर अशोक मुर्तडक, खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. बाळासाहेब सानप, आ. सीमा हिरे, आ. प्रा. देवयानी फरांदे आदी उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार सोहळ्यानंतर डॉ. अत्रे यांची प्रगट मुलाखत मंगला खाडीलकर घेणार आहेत. तसेच यावेळी चेतना बनावत, आरती ठाकूर-कुंडलकर, अश्विनी व्याघ्रांबरे-मोडक, अतींद्र सखडीकर यांचा गाण्याचा कार्यक्रम होणार असून त्यांना सुयोग कुंडलकर, माधव मोडक संगीत साथ करतील. सायंकाळच्या सत्रात, गायनाचा कार्यक्रम होईल. नाशिककरांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.