सर्वसामान्य नागरिकांवर कराचा कोणताही बोजा पडू नये आणि जकातीएवढा महसूल गोळा होईल, असा सक्षम पर्याय मिळेपर्यंत जकात सुरूच ठेवावी, या मागणीसाठी म्युनिसिपल मजदूर युनियनतर्फे १२ जून रोजी राणीचा बाग ते आझाद मैदान, असा मोर्चा काढण्यात येणार आहे. संघटनेतर्फे गुरुवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
मुंबई महापालिकेतील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे आणि राज्य शासनाचे मत आजमावून न घेता महापालिका आयुक्त कायद्यात बेकायदा बदल करण्याची घाई करत आहेत. याचा विपरित परिणाम पाणी, घनकचरा, मलनि:सारण, शिक्षण, अग्निशमन यासारख्या नागरी सेवांवर होणार आहे. तसेच कंत्राटीकरणही मोठय़ा प्रमाणावर होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
येत्या १ जून रोजी भित्तीपत्रके आणि पत्रकांच्या माध्यमातून मुंबई शहर आणि उपनगरात जनजागृती अभियान केले जाणार असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. गरज पडल्यास नागरी सेवांच्या रक्षणासाठी आणि कामगारांच्या इतर न्याय्य मागण्यांसाठी १८ ते २० जून या कालावधीत मुंबई शहरात प्रखर आंदोलनही केले जाईल, असा इशाराही या वेळी देण्यात             आला.