उंच आकाशामध्ये झेपावत फुटणारे औटगोळे, त्यातून प्रकट होऊन काही क्षणात लुप्त होणारे रंगीबेरंगी तारे, तारामंडल, म्हैसूर कारंजे, धबधबे आदी पारंपरिक कृतींबरोबरच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाची जागृती व्हावी आणि ख-या अर्थाने ‘देशाचा विकास मतदारांच्याच हाती’ यांसारखी नेमकेपणाने प्रबोधनपर संदेश देणारी घोषवाक्ये शोभेच्या दारूकामाद्वारे पाहून लाखो नेत्रांचे पारणे फिटले. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेची सांगता बुधवारी रात्री या नयनरम्य शोभेच्या दारूकामाच्या आतषबाजीने झाली.
चार दिवस चालणाऱ्या सिद्धेश्वर यात्रेचा समारोप होम मैदानावर शोभेच्या दारूकामाने होतो. सुमारे साडेआठशे वर्षांपासूनची ही प्राचीन परंपरा आहे. या यात्रेतील शोभेच्या दारूकामाची ख्याती महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशात पोहोचली आहे. यंदा शोभेच्या दारूकामाची सेवा रुजू करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हय़ासह सातारा, सांगली व बीड आदी भागांतून पाच कलावंतांनी भाग घेतला होता. मैदानावर धुळीचे प्रदूषण होऊ नये म्हणून सर्वत्र पाण्याचे फवारे मारण्यात आले होते.
यात्रेनिमित्त पारंपरिक पद्धतीने सायंकाळी सिद्धेश्वराच्या नंदीध्वजांची मिरवणूक उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाडय़ातून निघाली. ही मिरवणूक होम मैदानावर पोहोचताच ‘एकदा भक्तलिंग हर बोला हर-सिद्धेश्वर महाराज की जय’ या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला. त्याच वेळी शोभेच्या दारूकामाविषयीची सर्वाची ताणली गेलेली उत्सुकता संपली. नंदीध्वज होम मैदानावर दाखल होताच शोभेच्या दारूकामाला थाटात प्रारंभ झाला. विविध कलाकृतींमधून साकार झालेले ४० फुटी त्रिशूळ, दिल्ली दरवाजा, जोगचा धबधबा, म्हैसूर कारंजा, ऑलिम्पिक तारामंडल, राज दरबारी, उगवता सूर्य, उंच धबधबा, सोनेरी धबधबा, पृथ्वी, कलर ट्री, ओम मंदिर, अशोकचक्र, पंचमुखीचक्र, दांडपट्टा व्हील, पंचमुखी, मुलूख मैदानी तोफ, मेगा ५५ शॉट, सहा इंची ऑलिम्पिक सिलिंडर, अश्रफी अनार, पृथ्वी, सोनेरी अनार, सूर्यचक्र इत्यादी विविध शोभेच्या दारूकामाचे आकर्षक प्रकार सादर करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धेश्वर यात्रेत शोभेच्या दारूकामामध्ये सातत्याने पहिले बक्षीस मिळविणारे एम. ए. पटेल यांनी विविध कलात्मक, सुंदर नक्षीकाम असलेले दारूकाम सादर करून सध्याच्या ज्वलंत सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधले आणि सर्वाची वाहवा मिळविली. शोभेच्या दारूकामाचा वापर निखळ मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधन करणारे अनेक सुंदर कलाविष्कार सादर करून पटेल यांनी सर्वाची मने जिंकली. यापूर्वी पटेल यांनी याच यात्रेत शोभेच्या दारूकामाच्या माध्यमातून मुंबईतील गाजलेला आदर्श सोसायटी घोटाळा, केंद्रातील स्पेक्ट्रम घोटाळा, धान्य घोटाळा, वाढती महागाई, निर्भया असे एकापाठोपाठ एक मुद्यांवर घोषवाक्यांद्वारे लक्ष वेधत समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला होता. यंदा त्यांनी मतदार जागृतीच्या मुद्यावर शोभेच्या दारूकामाच्या माध्यमातून प्रकाश टाकत सर्वाचे लक्ष वेधले. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कार्यक्षम प्रशासन चालवत असताना त्यांच्या विरोधात काही सत्ताधारी मंडळी उठाव करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या पाश्र्वभूमीवर ‘सुंदर सोलापूर-संधी सोडू नका..’ हा संदेश शोभेच्या दारूकामातून साकार केला आणि सर्वाची मने जिंकली.
पटेल यांच्या तोडीस तोड असे दारूकाम विटा (जि. सांगली) येथील बाबालाल फायर वर्क्‍स यांनी सादर केले. त्यामुळे शोभेच्या दारूकामातील रंगत वाढली. त्यांची मुलूख मैदानी तोफ गाजली. महाबहुरंगी औटगोळे चित्तवेधक ठरले. बीड जिल्हय़ातील चौसाळा येथील जय महाराष्ट्र फायर वर्क्‍सने धबधबा, चाफा, चांदणी रंगोत्सव, दिल, रंगीत मिनार, रंगीत सुरू वृक्ष, धावते चक्र, डिजिटल रंगीबेरंगी औटगोळे पेश केले. तर करमाळा तालुक्यातील रोशेवाडीच्या उत्सव फायर वर्क्‍सने नर्गिस, २५ फुटी धबधबा, सुरू वृक्ष आदी तेरा प्रकार सादर करून सर्वाना आनंद दिला. कराड येथील आदित्य फायर वर्क्‍सतर्फे चाफा वृक्ष, सुरू वृक्ष, महाद्वार, २५ फुटी धबधबा, दिल्ली दरवाजा अशा कलात्मक कृतींचे दर्शन घडविण्यात आले. कराड (जि. सातारा) येथील आदित्य फायर वर्क्‍सतर्फे सुदर्शन चक्र, छत्रीचक्र, धबधबा, पंचमुखी, जादूचे चक्र, दांडपट्टाचक्र आदी कलाप्रकार सादर करण्यात आले. या शोभेच्या दारूकामाच्या स्पर्धेसाठी यंदाच्या वर्षी जिल्हा सत्र न्यायाधीश अश्विनीकुमार देवरे, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर व सोलापूर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना आमंत्रित करण्यात आले होते. परीक्षकांनी रात्री उशिरा निकाल जाहीर केला. विजेत्या कलावंतांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यात्रा शोभेचे दारूकाम समितीचे सभापती अ‍ॅड. मिलिंद थोबडे, सोमशंकर अळगुंडगी आदींनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.