सलग दोन वर्षांपासून राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. यातून कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी शासनाने गावागावात सिमेंट बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. संगमनेरमध्ये १४ कोटी रुपयांच्या निधीतून ६१ बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांची काळजी आता लोकांनी घेतली पाहिजे. केवळ सरकारला दोष देण्यात काहीही अर्थ नाही, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
तालुक्यातील ५६ सिमेंट बंधाऱ्यांचे लोकार्पण आज मंत्री थोरात यांच्या हस्ते चिंचोली गुरव येथे करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते तर व्यासपीठावर कोपरगावचे संभाजीराव काळे, राहुरीचे डॉ. चारुदत्त पवार, पंचायत समितीच्या सभापती श्रीमती सुरेखा मोरे, बाबा ओहोळ, अनिल देशमुख, भाऊसाहेब कुटे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मंत्री थोरात म्हणाले, पाणी पातळी खोलवर गेलेल्या राज्यातील १५ तालुक्यांना शासनाने १५० कोटींची मदत करण्याचा निर्णय घेतला. पाणी टंचाई दूर करण्यासाठी गावागावात सिमेंट बंधारे यातून बांधले जात आहे. राज्यात १ हजार ४२३ तर संगमनेरमध्ये ६१ बंधारे बांधले जात आहे. प्रत्येक तालुक्यासाठी दहा कोटींची मदत शासनाने केली. मात्र माझ्या प्रयत्नातून ही मदत १४ कोटींवर नेली. या पावसाळ्यात चांगला पाऊस पडून हे बंधारे भरतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
आमदार डॉ. सुधीर तांबे, सभापती सुरेखा मोरे, अविनाश सोनवणे यांची यावेळी भाषणे झाली. कार्यकारी अभियंता आनंदा मोरे यांनी यासंदर्भातील भूमिका विषद केली. नामदेव कहांडळ यांनी आभार मानले.