सर्वसामान्यांमध्ये आरोग्य विषयक जागरुकता निर्माण होण्यासाठी आरोग्य विद्यापीठ प्रयत्नशील असून यासाठी शिक्षकांमार्फतही आरोग्य विषयक सजगता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अरूण जामकर यांनी केले.
येथील आरोग्य विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ हेल्थ कम्युनिकेशनतर्फे विद्यापीठात महारष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षकांच्या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर कुलगुरूंसह कुलसचिव डॉ. के. डी. गर्कळ, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, नाशिक माध्यमिक मुख्याध्यापक संघटनचे अध्यक्ष शिवाजी शिरसाठ, समुपदेशक सुनील आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. जामकर यांनी विद्यापीठातर्फे आरोग्य विषयक जनप्रबोधनाचे महत्व ओळखून विविध उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती दिली. आरोग्य विषयक सजगता समाजामध्ये निर्माण करण्यासाठी विद्यापीठाव्दारे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विद्यापीठांतर्गत डिपार्टमेंट ऑफ हेल्थ कम्युनिकेसनची स्थापना करण्याचे योजले असून त्याव्दारे आरोग्य विषयक जनप्रबोधनाची मोहीम व्यापकरित्या करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत माहिती प्रसारित करण्याचे काम शिक्षकांनी करण्याची सूचना कुलगुरूंनी केली.
कुलसचिव डॉ. गर्कळ यांनी शिक्षकांनी शिकविलेल्या मूल्यांविषयी सांगितले. नाशिक माध्यमिक मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी शिरसाठ यांनी विद्यापीठाने शिक्षक प्रशिक्षणार्थीना निश्चितच विद्यापीठाला दिलेल्या ज्ञानाचा लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे समुपदेशक सुनील आहेर यांनी विद्यार्थ्यांतील कलागुणांना ओळखून त्यांना कारकीर्द निवडण्यासाठी योग्य मार्गदर्शन या भेटीमुळे शक्य होणार असल्याचे नमूद केले. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनीही विद्यापीठाच्या कार्याची माहिती दिली.
विद्यापीठाच्या आयुष विभागाचे डॉ. प्रदीप आवळे आणि डॉ. श्वेता तेलंग यांनी ‘आयुर्वेदाची ओळख’ तर, विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखा संशोधन व तंत्रज्ञान विभागाचे डॉ. धनंजय सांगळे यांनी ‘आपत्तीतील वैद्यकीय व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्यान दिले. आभार निर्मला अष्टपुत्रे यांनी मानले.