राज्य लोकसेवा आयोगातर्फे सहाय्यक पदासाठी, तर मुंबई महापालिकेच्या लिपिक पदासाठी एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा होत आहेत. त्यामुळे परीक्षेची वेळ बदलून मिळावी, अशी विनंती परीक्षेसाठी सुरू केलेल्या पालिकेच्या हेल्पलाइनवर अनेक उमेदवारांनी केली. परंतु, तुमचे तुम्ही पाहून घ्या, अशी उडवाउडवीची उत्तरे तिथे मिळाल्याने उमेदवार संतप्त झाले आहेत. पालिकेने सहकार्य न केल्यास या उमेदवारांना एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे.
मुंबई महापालिकेच्या विविध विभागांसाठी ९४२ लिपिकांची भरती करण्यात येणार असून राज्यभरातून या परीक्षेसाठी ७१,८१६ अर्ज आले आहेत. या भरतीसाठी प्रथमच ऑनलाइन परीक्षा होत आहे. टप्प्याटप्प्याने १३ ते १५ जून या कालावधीत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी, नागपूर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, कल्याण, कोल्हापूर, पुणे, सातारा, सोलापूर या केंद्रांवर ही ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना वेगवेगळी वेळ देण्यात आली आहे. परीक्षेची प्रवेशपत्रे ३० मेपासून उमेदवारांना पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली. तसेच ऑनलाइन परीक्षेबाबत काही अडचणी असल्यास टोल फ्री क्रमांक १८००१०२२००४ वर संपर्क साधण्याचे आवाहन उमेदवारांना करण्यात आले.
राज्य लोकसेवा आयोगातर्फे १५ जून रोजी सकाळी १०.३० ते दु. १२ या वेळेत सहाय्यक पदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर याच दिवशी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत पालिकेची ऑनलाइन परीक्षा होत आहे. काही जणांनी या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केले होते. त्यापैकी काही जण या दोन्ही परीक्षांसाठी पात्र ठरले असून दोन्ही परीक्षांचे प्रवेशपत्र त्यांना मिळाले आहे. मात्र दोन्ही परीक्षांची साधारण एकच वेळ असल्यामुळे उमेदवार चिंतेत पडले आहेत. काही उमेदवारांनी पालिकेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. पण रिंग वाजून फोन बंद झाला. काही उमेदवारांचा हेल्पलाइनवर संपर्क झाला. पण तुमचे तुम्हीच पाहून घ्या, अशी बोळवण करण्यात आली. त्यामुळे काही उमेदवारांनी थेट महापौर सुनील प्रभू यांना ई-मेल पाठवून मदत करण्याची मागणी केली आहे. मात्र पालिकेने मदत केली नाही, तर एका परीक्षेवर पाणी सोडण्याची वेळ या उमेदवारांवर येणार आहे.