ठाणे स्थानक ते कासारवडवली या मार्गावर दररोज ३० खासगी बसेस धावत आहेत. या बसेसमधून दिवसाला सुमारे १५ हजार प्रवाशांची वाहतूक केली जाते. या बसेसना मिळणाऱ्या प्रतिसादाचे मूळ त्यामधील उत्तम व्यवस्थापनात आहे. प्रवाशांच्या सोयीनुसार बसमालक आपल्या धोरणांत बदल करत असतात. एकावेळच्या प्रवासाकरिता १० रुपये भाडे आकारले जाते. टीएमटीच्या तुलनेत हा प्रवास स्वस्त असल्याचा प्रवाशांचा दावा आहे. या बसेस बंद होण्याचे प्रमाणही कमी आहे. घोडबंदर परिसरात मोठ-मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. यातील बरीचशी गृहसंकुले मूळ रस्त्यापासून एक ते दीड किलोमीटर आत आहेत. टीएमटीची बस या संकुलांपर्यंत पोहचत नाही. याउलट प्रवाशांनी विनंती केल्यास खासगी बसेस थेट घरपोच सेवा पुरवितात. ठराविक थांबे ही संकल्पना या बसेससाठी नाही. त्यामुळे प्रवाशाने हात केला तर ही बस थांबते. त्यामुळे हवे तेथे बसमध्ये चढता येत असल्याने प्रवासीही खूश असतात. सकाळपासून दर दहा मिनिटांनी या बसेस उपलब्ध असतात.     
टीएमटी, रिक्षांच्या नाकार्तेपणाला घोडबंदरवासीयांचा ठेंगा
चैतन्य पिंपळखरे
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमातील (टीएमटी) बससेवेचा उडालेला बोजवारा आणि शहरातील रिक्षाचालकांच्या मुजोर कारभारामुळे ठाणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे अक्षरश तीनतेरा वाजले असताना ठाणेकरांनी आता खासगी बसचालकांच्या हाकेला प्रतिसाद देत वाहतुकीच्या सार्वजनिक खासगीकरणाचा एक नवा ‘ट्रेंड’ सध्या अमलात आणला आहे. वरवर पाहता अनधिकृत वाहतुकीचा शिक्का बसूनही कमी भाडे, सतत होणाऱ्या फेऱ्या, उत्तम सुविधा तसेच प्रवाशांच्या सोयीचे व्यवस्थापन यामुळे रेल्वे स्थानकापासून घोडबंदर मार्गावर होणारी ही खासगी बस वाहतूक प्रवाशांसाठी कमालीची ‘हिट’ ठरू लागली आहे. ठाण्यातील राजकीय पक्ष, टीएमटी तसेच मुजोर रिक्षाचालकांच्या नाकर्तेपणाला प्रवाशांकडून मिळालेली ही मोठी चपराक मानली जात आहे.
ठाण्याची नवीन ओळख ठरू लागलेल्या घोडबंदर रोड परिसरातील रहिवाशांच्या प्रवासाचा सर्व भार सध्या या खासगी बस वाहतुकीने उचलला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाच्या पलीकडे विस्तारत जाणाऱ्या ठाण्याच्या नागरीकरणाचा वेग जबरदस्त असून घोडबंदर मार्गावर नागरी वस्त्यांसाठी स्थानिक शासकीय प्राधिकरणांकडून अजूनही म्हणाव्या त्या प्रमाणात प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथून नोकरीधंद्यानिमित्त रेल्वे स्थानकाकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. या भागात असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांमुळे येथे येणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही मोठी आहे. टीएमटीच्या अपुऱ्या बसेस हे ठाणेकर प्रवाशांचे जुने दुखणे आहे. प्रवाशांची मागणी असूनही नकारात्मक धोरणांमुळे टीएमटीला अजूनही आपल्या सेवेचे जाळे विस्तारता आलेले नाही. रडतखडत सुरू असलेल्या टीएमटी बसेस पाहून घोडबंदर मार्गावरील काही विकसकांनी आपल्या वसाहतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांसाठी सुरुवातीच्या काळात खासगी बसेस सुरू केल्या. सुरुवातीला तुरळक वाटणाऱ्या या बसेसचे मोठे जाळे आता विस्तारू लागले असून खासगी सार्वजनिक वाहतुकीच्या या नव्या व्यवस्थेला प्रवाशांनीही आपलेसे केल्याचे दिसू लागले आहे. विशेष म्हणजे, याच भागातील काही स्थानिकांनीही खासगी बसेस विकत घेऊन याकडे व्यवसायाचे नवे साधन म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे. या धंद्यातील नफा लक्षात घेऊन बसेसची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. कासारवडवली भागातून ठाणे स्थानकापर्यंत सुरू झालेली ही बससेवा चांगलेच बाळसे धरू लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कापूरबावडी ते भिवंडी या नव्या मार्गावरही अशा प्रकारची सेवा सुरू झाली आहे. या सेवेसही मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.