भारतासह संपूर्ण जगभरात होत असलेला एड्स रोगाचा प्रसार चिंताजनक असून एड्स बाधितांचा आधार बनण्यासाठी सामूहिक इच्छाशक्ती निर्माण होणे अपेक्षित आहे, असे मत स्नेहालय संस्थेच्या सचिवा ब्रह्मकुमारी प्रमिलाबेन जाधव यांनी व्यक्त केले.
कुर्डूवाडी येथे डॉ.विनायक वागळे मेमोरियल ट्रस्ट संचालित उम्मीद संस्था व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एड्स जनजागरण फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून ब्रह्मकुमारी प्रमिलाबेन बोलत होत्या. डॉ. जयंत करंदीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत त्रिंबके, समुदेशक सत्तार तांबोळी, उम्मीदचे अधीक्षक अष्टविनायक स्वामी यांच्या उपस्थितीत ब्रह्मकुमारी प्रमिलाबेन व रमेश समर्थ यांनी हिरवे झेंडे दाखवून एड्स जनजागरण फेरीचा शुभारंभ केला.
समाजात सद्गुणांची वानवा तर दुगुर्णाची खाण वाढली आहे. उम्मीद व स्नेहालय यांसारख्या संस्था सतीचे वाण आहेत. नवीन पिढीचे प्रबोधन करून त्यांना सुरक्षित जीवनाचे महत्त्व समजावून द्यायले हवे, असे मत डॉ. करंदीकर यांनी मांडले. जनजागरण फेरीचा समारोप कुर्डूवाडी पंचायत समितीच्या विठ्ठलराव शिंदे सभागृहात झाला. या फेरीमध्ये के. एन. भिसे महाविद्यालय, आयटीआय संस्था, जय तुळजाभवानी अध्यापक विद्यालय, स्नेहालय संस्था (कारंबा) आदी विविध संस्थांतून पाचशे विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.