‘सिंफनी’या वाद्यवृंद संस्थेचे संस्थापक तसेच ‘झपाटा’, ‘यादें शंकर जयकिशन’ या कार्यक्रमांचे निर्माते कृष्णकुमार गावंड लिखित ‘सुरा मी वंदिले’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच शिवाजी मंदिर, दादर येथे एका कार्यक्रमात झाले. स्वमुग्धा आर्ट्स् आणि सिद्धार्थ प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या वेळी बोलताना संगीतकार अशोक पत्की म्हणाले की, गाणे ऐकायला गोड असते पण ते चांगले किंवा वाईट असते, त्याचे विश्लेषण गावंड यांनी या पुस्तकात केले आहे. तर संगीतकार-गायक अवधूत गुप्ते यांनी सांगितले की प्रत्येक गाण्याला एक कोन असून श्रोता आपापल्या कोनानुसार त्या गाण्याकडे पाहत असतो. क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सिद्धार्थ प्रकाशनाचे शिवाजी धुरी यांनी प्रास्ताविक तर दीपाली केळकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी या पुस्तकावर आधारित दृकश्राव्य कार्यक्रमही सादर करण्यात आला.
‘महाराष्ट्र कन्या’स्पर्धा
राज्य विश्वकोश मंडळातर्फे विक्रोळी येथील संदेश महाविद्यालयात ‘महाराष्ट्रकन्या’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत महिला आणि पुरुष शिक्षक सहभागी झाले होते. स्पर्धकांनी जिजामाता, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, डॉ. स्नेहलता देशमुख, साधना आमटे, कमलाबाई होस्पेट, लता मंगेशकर, आशा भोसले अशा विविध क्षेत्रातील २० महिलांची निवड केली होती. या स्पर्धेत उमा गावकर या प्रथम आल्या. पहिल्या क्रमांकाचे सन्मानचिन्ह डॉ. विजया वाड यांच्या हस्ते गावकर यांना देण्यात आले. डॉ. समृद्धी म्हात्रे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
बाल साहित्यात प्रयोगशीलता असावी
लहान मुलांच्या साहित्याचा संशोधन आणि प्रयोगशीलतेच्या माध्यमातून प्रसार करणे म्हणजे त्यांच्यात आपली संस्कृती रुजविण्यासारखे आहे आणि तेच आपल्या मराठी भाषेचे वैभव आहे, असे मत माजी पोलीस उपायुक्त धनराज वंजारी यांनी नुकतेच विलेपार्ले येथे केले. भरारी क्रिएशन्सच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्ताने साठय़े महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी माधव कुंटे लिखित ‘रुपेरी परीच्या कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. भरारी क्रिएशन्सच्या लता गुठे यांनीही आपले मनोगत या वेळी व्यक्त केले.