एखाद्या कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचे कौतुक करायला मोठे मन लागते, ते मोठेपण ‘पुलं’मध्ये होते. कलाकारांवर प्रेम करणारे ते चतुरस्र कलाकार होते, अशा शब्दांत संगीत मरतड पं. जसराज यांनी पु. ल. देशपांडे यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.
आशय सांस्कृतिकच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुलोत्सव’मध्ये पं. जसराज यांना ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या हस्ते ‘पुलोत्सव जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्कारापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत व कार्यक्रमातही ‘पुलं’विषयीच्या आठवणी सांगतानाच त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. मानपत्र, मानचिन्ह, पुणेरी पगडी व ५१ हजार रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पंडितजींच्या पत्नी मधुरा जसराज, चित्रपट दिग्दर्शक किरण शांताराम, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव तसेच आनंद भांडवलकर, सतीश कुबेर आदींची पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती होती.
कार्यक्रमात बोलताना पं. जसराज म्हणाले, हास्य हा पुलंच्या जीवनाचाच भाग होता. ते हास्याचे बादशाह होते. लेखक व संगीतकारही होते. साहित्यिकच नव्हे, तर एका मोठय़ा संगीतकाराच्या नावाने मला हा पुरस्कार मिळाला, याचा आनंद वाटतो. स्वत:वर विनोद करणे सोपी गोष्ट नाही, हे काम हास्याचा बादशाहच करू शकतो. ते काम ‘पुलं’नी केले. हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाची बाब आहे.
मिरासदार म्हणाले, ‘पुलं’चे पहिले प्रेम संगीतच होते. मात्र, विनोदी लेखनातून त्यांनी मराठी साहित्यात मोठे योगदान दिले. ‘पुलं’नी व्यक्तिगत हल्ला करणारा विनोद केला नाही. त्यांनी विनोदाला सुसंस्कृतपणाचा दर्जा दिला. जीवन किती सुंदर करता येते, हे त्यांनी दाखवून दिले.
कार्यक्रमानंतर मृणाल कुलकर्णी हिने पं. जसराज व मधुरा जसराज यांची मुलाखत घेतली.